कवच-कुंडले असतानाही द्रौपदी-स्वयंवरात, घोषयात्रेत व गोग्रहणाच्या वेळी तो पराभव पावला होताच. मग ही आत्यंतिक दानशूरता तरी का? 'मी कोण?' ह्याच्या शोधापायीच असे झाले का? आपली छाप इतरांवर पाडायची गरज त्याला वाटत होती. त्याच्या मनातील खळबळीचा, समाजातील स्थान पक्के नसल्यामुळे वाटणाऱ्या दैन्याचाच हा परिणाम असेल का? कर्णाच्या प्रत्येक कृत्यात अपेक्षित मर्यादांचे उल्लंघन दिसते. शस्त्ररंगात त्याने आपले नैपुण्य दाखवले, ते योग्य होते; पण अर्जुनाशी द्वंद्व करावयास मागणे म्हणजे अतिप्रसंगच होता. तीच गोष्ट द्रौपदी-वस्त्रहरणाच्या वेळची. पांडवांची मानहानी होत होतीच. कर्णाने मध्ये पडण्याचे कारण नव्हते. पण त्याला राहवले नाही. दृष्कृत्यच नव्हे, तर सत्कृत्यातही तो पटदिशी साधारण माणसांच्या मर्यादा ओलांडून काहीतरी जास्त करण्याच्या मोहात पडे.
कर्णाच्या आयुष्यात काही क्षण सोन्याचे ठरले. कुठच्या तरी वेळी मोठे सुख, मोठी ऋद्धी वा मोठा मान मिळाला म्हणून नव्हे. लौकिकाने तो होता, तोच राहिला, पण त्याच्या मनातल्या व्यथा नाहीतशा व्हाव्यात, असे ते क्षण होते. 'आपण कोण?' ह्याचे त्याला उत्तर मिळाले; पण त्याच क्षणी त्याने उत्तराने उद्भवणाऱ्या पेचातून मोठ्या उदात्तपणे आपली सुटका करून घेतली. कर्णाच्या पूर्वीच्या व पुढच्याही आयुष्यात मनाचा गोंधळ दिसून येतो. पण ह्या दोन प्रसंगांतील त्याचे बोलणे व त्याचे कृत्य ह्यांत विचारांचा विलक्षण स्पष्टपणा दिसतो. कोठेही शंका नाही, की गोंधळ नाही.सर्व गढूळपणा जाऊन मन आरशासारखे लख्ख झालेले दिसते. हे दोन्ही प्रसंग मानवी पातळीवरचे आहेत. ह्यात कर्णाची आणखी एकदा परीक्षा, अतिशय कठीण परीक्षा झाली आहे. कर्ण ह्या परीक्षेत उतरला. तो सर्वस्वी मानवी पातळीवरच. काहीही दैवी,अतिमानुष, अत्युदात्त असे न दाखवता. त्याही वेळी त्याची निराशा, संताप-सर्व काही व्यक्त होते. पण ते व्यक्त करताना त्याच्यात दीनपणा दिसत नाही.
पान:Yugant.pdf/157
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त / १३९
