पान:Yugant.pdf/156

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३८ / युगान्त

 अशा तऱ्हेची लूटमार त्वरेने करावी लागते; मोठ्या लढाईला वेळ नसतो; वेळ गमावला, तर शत्रूला आणखी सेना आणता आली असती, म्हणून निघून जाणेच योग्य होते, वगैरे सर्व मुद्दे लक्षात घेतले, तरी अर्जुनाने आपल्या कौशल्यामुळे सैन्याने वेढलेल्या गाईंना मोकळे केले; गाई उधळून लावल्यावर कौरवांनाही हात दाखवला; व त्यांना मागे परतण्यावाचून गत्यंतर नाही अशी स्थिती आणली, ह्यात शंकाच नाही. अर्जुनाला भेकड सारथी मिळूनही रथातून लढण्याचे महारथित्वाचे आपले कौशल्य त्याने प्रकट केले. कर्ण युद्धविद्येत अर्जुनापेक्षा कमी ठरला.
 कर्णकथेत सूर्याची निरर्थक लुडबूड जिथे-तिथे दिसते. 'इंद्र कवच-कुंडले मागायला येईल ती तू देऊ नकोस,' असे म्हणे सूर्याने कर्णाला सांगितले. तसेच, ‘तू माझा मुलगा,' असे कुंती म्हणाली, तेव्हाही “कुंती म्हणते ते खरे आहे. कर्णा, आईचे ऐक,"असे सूर्य बोलला. कर्णाने दोन्ही वेळा त्याचे ऐकले नाही. गोष्टीच्या परिपोषाच्या दृष्टीने सूर्याची ही भाषणे अगदी निरुपयोगी व अवास्तव आहेत. सूर्याला मुलाची एवढी काळजी होती, तर शस्त्ररंगाच्या वेळी ‘हा माझा मुलगा,' असे तो का बोलला नाही? ह्या आकाशवाणीने कर्णाचे क्षत्रियत्व सिद्ध झाले नसते, पण देवपुत्रत्व तरी त्याला मिळाले असते.
 कर्ण सूर्यपूजा का करीत असे, तेही समजत नाही. कुंडले ही वस्तू कान फाडून देण्यासारखी आहे. पण सहज-कवच अंगावरून सोलून रक्तबंबाळ होऊन दिले, म्हणजे काय? सहज-कवच गेल्यावर कर्ण काही लढाईत कवचहीन लढला नाही. अर्जुनाच्या बाणांनी त्याचे कवच फोडले, असे वर्णन आहे. जे इतरांना नाही, ते कर्णाजवळ होते. त्यामुळेच आपण वास्तविक सूतपूत्र नाही, ह्याची त्याला मनातून खात्री होती. कवच-कंडलांमळे तो अजिंक्य होता का? ती देण्याने त्याने मरण ओढवून आणले असे म्हणावे का?