पान:Yugant.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त / १३७
 

काहीतरी कुरापत निघून भांडण उद्भवले. त्या भांडणात गंधर्वांनी कौरवांना मारून काढले व दुर्योधनाला कैद करून नेले. ह्या हाणामारीत कर्ण पळून गेला व त्याने एका जवळच्या खेड्यात आश्रय केला. शेवटी पांडवांनी दुर्योधनादी कौरवांना सोडवले व त्यांची परत पाठवणी केली. पांडवांनी कौरवांना सोडवले हे कळायच्या आधीच राजा कैद झाला, ही बातमी हस्तिनापुराला पोहोचली होती व भीष्म सैन्य घेऊन राजाला सोडवायला निघाला होता. तेवढ्यात त्याला सुटकेचीही हकीकत कळली. वाटेत कर्ण भेटला. त्याने राजा कोठे आहे, कसा आहे वगैरे विचारपूस केली. भीष्माने ताबडतोब उत्तर केले, “राजा जिवंत आहे ना, हे विचारावयाला खरे स्वामिभक्त जिवंतच राहत नाहीत. राजाला संकटात टाकून तू पळून आलासच कसा? तुझे राजावरचे प्रेम हे थोतांड आहे." कर्णाने दुर्योधनाच्या मित्राची भूमिका स्वीकारली होती. 'मी कोण?' ह्याचे उत्तर त्याच्यामते ‘मी दुर्योधनाचा मित्र', असे होते, पण ह्या प्रसंगाने व भीष्माच्या धिक्काराने त्याची परत एकदा जीवघेणी परीक्षा झाली व ती तो उतरला नाही.
 ह्या पुढचा प्रसंग गोग्रहणाचा. त्या वेळी तर अर्जुन एकटा होता व कौरवांच्या बाजूने लहान-मोठे सर्व वीर होते. तेथेही कर्णाचे अर्जुनापुढे चालले नाही. अर्जुनाने सगळ्यांचा पराभव केला, एवढेच नव्हे, तर त्यांची सुंदर तलम वस्त्रे हिरावून घेऊन त्याने ती उत्तरेला बाहुलीसाठी म्हणून दिली. हा प्रसंग जरी वगळला, तरी त्याने कौरवांना पिटाळून लावले व विराटाच्या गाईही सोडवल्या यात शंका नाही. 'आता युद्ध नको. राजाला मध्ये घालून माघारी वळा' हा भीष्माचा इशारा सर्वांनी पाळला, अशी एक पळवाट कर्णाला ह्याही प्रसंगी आहे,पण तीत अर्थ दिसत नाही. कौरव विराटाच्या राज्यात शिरले होते. गाई पळवायच्या, हा त्यांचा उद्देश. तो सिद्धीस गेला नाही तर परक्या राज्यात, परक्या देशात त्यांच्यावर बाका प्रसंग आला असता. अशा तऱ्हेची लूटमार त्वरेने