पान:Yugant.pdf/154

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३६ / युगान्त


ह्या सर्वांनी आपले सर्वस्व गमावले आहे. ते दास झाले आहेत. आपल्या वस्त्रावरसुद्धा त्यांचा हक्क नाही. काढा त्यांची वस्त्रे" हे शब्द ऐकल्याबरोबर पांडव आपली नेसती वस्त्रे सोडून सभेत बसले व दुःशासनाने कर्णाच्या सांगण्यावरून द्रौपदीचे वस्त्र फेडावयास सुरवात केली. कर्ण उठून बोलेपर्यंत चर्चा चालली होती; पण त्याने उठून द्रौपदीची विटंबना करण्यास उघड प्रोत्साहन दिले. संपत्तीबद्दल, राज्याच्या वाटणीबद्दल पुरुषा-पुरुषांत भांडण होते ते युद्धाने सोडवावे, वाटल्यास फासे खेळून सोडवावे; पण या भांडणामध्ये पराभूतांच्या बायकोची भरसभेत विटंबना करावयाचे कारण नव्हते. कर्ण सूत आहे की क्षत्रिय आहे, हा प्रश्न येथे नव्हता. सामान्य मानवधर्माचा प्रश्न होता. प्रश्न कायद्याचाही नव्हता. एका कुलस्त्रीची अब्रू घ्यायची का नाही, इतका सोपा प्रश्न होता. ह्या भावा-भावांच्या भांडणात कर्णाने अशा तऱ्हेने भाग घ्यायला कारणही नव्हते. पण कर्ण त्यात पडला आणि सूडापायी तो सदसद्विवेक अजिबात विसरू शके, हे सिद्ध झाले. घोषयात्रेच्या प्रसंगाने परत एकदा कर्णाला मान खाली घालावी लागली. त्यावेळी प्रत्येक राजाचे मोठ-मोठे गुरांचे कळप असत. हे कळप राज्याच्या हद्दीला लागून असलेल्या रानाशेजारी असत. कळपांची देखरेख करणारे अधिकारी असत. अधून-मधून खुद्द राजा कळपांची देखभाल करण्यासाठी जात असे. मागच्या वेळी असलेल्या गुरांच्या कळपात ज्या नव्या वासरांची भर झाली असेल, त्यांच्या अंगावर राजाच्या मालकीचे चिन्ह उमटवीत असत. बहुतेक हे चिन्ह म्हणजे तापलेल्या मुद्रेचा डाग असावा. पांडव वनात गेल्यावर हस्तिनापूरच्या लगतच्याच अरण्यात राहत होते. घोषयात्रा म्हणजे गोठ्यांची तपासणी करण्यासाठी केलेला प्रवास होय. ह्या निमित्ताने बायका, मुले व मोठा लवाजमा घेऊन रानात जायचे व आपल्या वैभवाचे प्रदर्शन करून निर्वासित पांडवांना खिजवायचे, हा या यात्रेचा मुख्य उद्देश होता.