पान:Yugant.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३४ / युगान्त

म्हटले; पण ती मैत्री अशा स्वरूपाची होती की, कर्णाचा ‘मी । कोण?' हा प्रश्न लोंबकळतच राहिला. दुर्योधनाच्या मैत्रीमुळे तो क्षत्रिय होऊ शकला नाही. दुर्योधनाने आपली बहीण किंवा कौरवकुळातील एखादी राजकन्या कर्णाला दिली नाही. याउलट कर्णाने स्वतःच उद्योगपर्वात सांगितल्याप्रमाणे त्याचे लग्न एका सूतकुळातील मुलीशी झाले व पुढे त्याच्या मुलामुलींचीही लग्ने सूतकुळातच झाली. ज्या घटकेला व प्रसंगात दुर्योधनाने कर्णाला जवळ केले, तो प्रसंगच अशा तऱ्हेचा होता की, दुर्योधनाचे व कर्णाचे नाते अगदी बरोबरीच्या मित्राचे झाल्यासारखे दिसत नाही. तो अगदी जवळचा पण स्वामिभक्त नोकरच राहिला. दुर्योधनाच्या प्रेमापेक्षा दुर्योधनाच्या उपकाराखाली कर्ण दबलेला होता. त्यामुळे लौकिकात कर्णाचे सूतत्व अढळ झाले. आपण खरे सूत नाही, ही भावना मात्र दृढच राहिली आणि वरून तर पूर्णपणे सूतत्व पदरी बांधले गेले. ह्या भयंकर परिस्थितीत त्याचे मन आतल्या-आत कुढत राहिले. पांडवांचे व आपले काही नाते आहे, हे त्याला माहीत नव्हते. असे असूनही त्याने पांडवांशीच वैर का धरले, ह्याला तीन कारणे असू शकतील. शस्त्ररंगात भीमाने त्याचा अपमान केला होता. अर्जुन त्या वेळचा मोठा योद्धा म्हणून अर्जुनाशी त्याची स्पर्धा होती. आणि पांडवांचा कट्टा वैरी जो दर्योधन त्याचा तो मित्र झाला होता. त्याच्या दुर्दैवाने स्पर्धेच्या प्रसंगी तो कमी ठरला व त्याची हृदयव्यथा वाढतच राहिली.
 पांडवांना लाक्षागृहात जाळायच्या कटात कर्ण नसावा. त्या कटात मुख्य मसलत धृतराष्ट्र व दुर्योधन या दोघा बाप-लेकाचीच होती, असे दिसते. हा कट फसल्यावर मात्र पुढील सर्व प्रसंगात कर्ण-दुर्योधनाच्या मसलतीत होता. एका आवृत्तीप्रमाणे द्रौपदी स्वयंवराच्या वेळी स्वयंवराचा पण जिंकायचा प्रयत्न कर्णाने केला. हा प्रसंग प्रक्षिप्त म्हणून नव्या आवृत्तीत वगळलेला आहे. कदाचित कर्णाचे धनुर्विद्येचे कसब पण जिंकण्याइतके मोठे नव्हते, किंवा