पान:Yugant.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त / १३३
 

(हा सर्वच भाग प्रक्षिप्त वाटतो. दुर्योधन त्यावेळी राजकुमार होता. धृतराष्ट्र हा राज्यावर(?) होता. राज्य भीष्माच्या देखरेखीखाली चालले होते. मुलांचे शिक्षण पूर्ण झाले होते. राज्य धर्माला मिळण्याची शक्यता उत्पन्न झाली होती, हे लगेच पुढच्या अध्यायावरून दिसून येते. अशा स्थितीत दुर्योधन कर्णाला कुठचेही राज्य देण्याला असमर्थच होता. त्याने राज्य द्यावे व लगेच तेथल्यातेथे अभिषेक करावा, ह्या गोष्टी अशक्य म्हणून प्रक्षिप्त वाटतात. हा भाग वगळून पुढे जे घडते, ते मात्र क्रमप्राप्त व अपरिहार्य वाटते.) कृपाने कर्णाला नाव व कुल विचारले, ते कर्णाला सांगता आले नाही. (मध्ये वर सांगितलेला प्रक्षिप्त भाग) तो गोरामोरा झाला. इतक्यात मांडवाच्या दरवाजाशी परत गडबड झाली. घाईघाईने, घाबऱ्याघाबऱ्या उपरणे (उत्तरीय) ज्याच्या पायांत लोळत आहे, असा अधिरथ आत शिरला. त्याला पाहून आदराने कर्ण पुढे झाला व 'बाबा' म्हणून त्याने नमस्कार केला, व पुत्रक' (पोरा) म्हणून अधिरथाने त्याला मिठी मारली. ‘तू कोणाचा?' ह्या कृपाच्या प्रश्नाला आपोआप, लगोलग उत्तर मिळाले. कर्णाला हवे असलले क्षत्रियत्व तर नाहीच मिळाले, पण सूतपुत्रत्व मात्र जाहीर झाले. भीमाने हृदयावर जखम केली. “अरे, तुझ्या धंद्याचे प्रतीक जो चाबूक तो हातात घे. शस्त्र कशाला धरतोस?" हे ते भयंकर शब्द होते. दुर्योधनाने कर्णाला मिठी मारली व आपली मैत्री देऊ केली व कर्णाने ती उपकृत बुद्धीने व आनंदाने स्वीकारली.
 सूर्य मावळला. बोलाचाली व भांडणे बंद झाली. शस्त्रविद्याप्रदर्शनाच्या रंगाचाही शेवट झाला.
 'मी कोण?' ह्या प्रश्नाचा उलगडा तर बाजूलाच राहिला, पण नवीन गुंता मात्र उत्पन्न झाला. त्या वेळी नाही, पण नंतर कधीतरी कर्णाला अंगाचे राज्य मिळाले. राज्य मिळवूनही कर्ण कायम कौरवांच्या दरबारीच राहिला. दुर्योधनाने कर्णाला आपला मित्र