पान:Yugant.pdf/148

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३० / युगान्त

 तो कसा सापडला, त्याच्याबरोबर काय होते, ह्या गोष्टी लहानपणापासून त्याला माहीत होत्या. आपण क्षत्रिय आहोत, आज नाही उद्या आपली क्षत्रिय आई किंवा बाप आपला स्वीकार करील, अशी त्याला आशा होती. अधिरथाबद्दल व राधेबद्दल त्याला प्रेम व कृतज्ञता असूनही त्यांच्यातलाच एक म्हणजे सूत म्हणून तो रहायला तयार नव्हता. राजपुत्र नाही, म्हणून त्याला विख्यात गुरुकडे उघड रीतीने शस्त्रविद्या शिकता आली नाही. तो चोरून-मारून, आपले नाव लपवून ती शिकला. तीत अतिशय निष्णात झाला. नंतर आपले असामान्य कौशल्य दाखवण्याची त्याने संधी साधली. पण त्याचे परिणाम मात्र भयंकर झाले.
 तो प्रसंग असा : धर्मादी पांडवांना व दुर्योधनादी धार्तराष्ट्रांना शस्त्रविद्या शिकवून झाली होती. आपले शिष्य शस्त्रविद्येत किती तरबेज झाले आहेत, हे कौरवप्रमुखांना दाखवण्यासाठी द्रोणाचार्यानी मोठा समारंभ केला. मोठे मैदान मध्ये ठेवून भोवती माणसे बसण्यासाठी मांडव घातले. धृतराष्ट्र, गांधारी, भीष्म, विदुर, कुंती व कौरवसभेतील इतर मोठी मंडळी जमली होती. सर्वजण मुलांचे कौतुक पाहत होती. सर्वात कमाल केली अर्जुनाने. धनुर्विद्येतील त्याचे असामान्य प्रभुत्व पाहून सर्वजण थक्क झाले. एवढ्यात रंगद्वाराशी गलबला झाला. एक महाकाय, तेजस्वी तरुण पुरुष आत शिरला व म्हणाला, “या अर्जुनाने करून दाखवले, ते सर्व मी करून दाखवतो. त्याचप्रमाणे त्याने अर्जुनाने दाखवलेली सर्व करामत करून दाखवली, व नंतर अर्जुनाला द्वंद्वयुद्धास पाचारण केले.
 रंगात शिरलेला पुरुष कर्ण होता. तोपर्यंत त्याला कोणी पाहिलेले नव्हते.
 महाभारतातील इतर महत्त्वाच्या प्रसंगांप्रमाणे हाही प्रसंग लहानसाच, अतिशय गतिमान व नाट्यपूर्ण आहे.