पान:Yugant.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त / १२९
 

भावना उत्पन्न होते. कुटुंबापलीकडे ‘मी'चा विस्तार होत राहतो. आणि ज्या-ज्या संबंधांत तो ‘मी' जाणवतो, त्या-त्या संबंधांमध्ये त्या 'मी'च्या विरुद्ध असलेला 'मी'हून दुसरा 'तू' किंवा 'तो' हा जाणवतो, व त्या दुसऱ्याच्या 'मी'बद्दलच्या अपेक्षाही जाणवतात. त्या अपेक्षा म्हणजे मनुष्याच्या मीपणाचे निरनिराळे आविष्कार असतात. 'मी' मुलगा असतो, बाप असतो, नवरा असतो, त्याचप्रमाणे एखाद्या शहराचा रहिवासी असतो, एखाद्या जातीचा, कुळाचा असतो. त्यात जसे अधिकार असतात, तशीच कर्तव्येही असतात. आणि एका तऱ्हेच्या 'मी'चा दुसऱ्या तऱ्हेच्या 'मी'पासूनचा फरक निरनिराळ्या सामाजिक प्रसंगांनी व बच्याचदा धार्मिक संस्कारांनी स्पष्ट होतो. विदुर सूत म्हणून त्याच्यावर सूताचे संस्कार झालेले होते. त्याचे सामाजिक स्थान अगदी घट्ट, पक्के झालेले होते. भाऊ म्हणून धृतराष्ट्राने त्याला प्रेमाने मांडीवर घेतले, त्याला मिठी घातली. (सोऽङ्कमादाय विदुरं मूध्न्रर्युपाघ्राय चैव । ह।क्षम्यतामिति चोवाच। ३.७२० ह्या प्रकरणात ३.७४ व ३.८४ हे दोन्ही अध्याय वाचावे.) पण त्याला काही कुणी राजकन्या लग्नात मिळाली नाही, किंवा क्षत्रिय म्हणून त्याचा सन्मानही झाला नाही. उपेक्षित जिणे जगुनही 'मी कोण?' हा प्रश्न विदुराला पडला नाही. कर्ण ह्या प्रश्नाच्या दुष्ट भोवऱ्यात सापडला होता. त्याला समाजात निश्चित स्थान नव्हते. त्याच्या मनाला त्याचे स्थान निश्चित करता येत नव्हते. जे स्थान माझे आहे असे त्याला वाटत होते. ते मिळवण्यासाठी त्याची सारी धडपड होती; आणि ते मिळत नाही, म्हणून तो जन्मभर जळत राहिला.
 अधिरथ नावाच्या सुताकडे कर्ण जवळ-जवळ जन्मल्यापासून वाढला. अधिरथाची बायको राधा हिने आपल्या मुलाप्रमाणे त्याला वाढवले. पण तो त्यांच्या पोटचा मुलगा नाही, ही गोष्ट लपवून ठवलेली नव्हती. जन्माबरोबरच कवच-कुंडले त्याच्याजवळ होती. पुष्कळ द्रव्य त्याच्याबरोबर आलेले होते. त्याला अधिरथाने नाव