पान:Yugant.pdf/146

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२८ / युगान्त


 धृतराष्ट्र व पांडू यांचा बाप व्यास. विदुराचाही बाप तोच होता. पण पहिल्या दोघांच्या आया राजकन्या म्हणून त्यांना राज्यपद मिळाले. दोघांनाही व्यंगे होती, तरी राज्योपभोग घेता आला. पांडूमागून राज्याभिषेक न होता धृतराष्ट्राने पंधरा-वीस वर्षे राज्य भोगले. बिचारा विदुर अव्यंग व बुद्धिमान असूनही आईमुळे ‘सूत' ठरला. राज्याला पारखा झाला. विदुराच्या आयुष्यातील विफलता जागोजाग प्रत्ययास येते. पण त्याचबरोबर अध्ययनाने व चिंतनाने ह्या विफलतेवर मात करण्याचे त्याचे प्रयत्नही दिसून येतात. जन्मतःच समाजातील स्थान ठरल्यामुळे व आपण कोण ह्याची जाणीव झाल्यामुळे त्या 'आपण'च्या किंवा 'मी'च्या मर्यादा त्याला आखता आल्या; एवढेच नव्हे, तर महत्प्रयासाने लौकिक 'मी'च्या सीमा ओलांडता आल्या. कर्णाच्या आयुष्याला व अंतःकरणाला जी विफलता ग्रासून राहिली होती, ती हीच होती की, त्याला ‘मी कोण?' ह्याचे उत्तर पहिल्यांदा मिळाले नाही व जेव्हा मिळाले, तेव्हा ते निरुपयोगी ठरले.
 सर्वसाधारणपणे मानवी आयुष्यात ‘मी कोण?' ह्याचे उत्तर आयुष्याच्या सुरवातीपासून मिळत जाते. आयुष्यातील कुठच्याही क्षणी हे उत्तर पूर्ण नसते. 'मी'चे परिमाण सारखे वाढत असते, पण त्याचबरोबर ‘मी'च्या मर्यादा स्पष्ट होत जातात. जन्मल्यापासून काही वर्षे लहान मुलांना 'मी' या शब्दाची जाणीव नसते. ती स्वतःचा उल्लेख पुष्कळदा तृतीय पुरुषानेच करतात. मीपणाची जाणीव ‘माझे'पणात असते. ही माझी आई. हा माझा बाप. ही माझी खेळणी. हे माझे घर. ही माझी भावंडे. आणि ज्याच्याभोवती ह्या सर्व वस्तू गोळा झाल्या आहेत, ते केंद्र ते मी, ही जाणीव कौटुंबिक व नंतर सामाजिक संबंधांपासून दृढ होऊ लागते. 'ही माझी आई', ह्या भावनेबरोबरच 'मी हिचा मुलगा', ही भावना उत्पन्न होते.