पान:Yugant.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२६ / युगान्त

निष्ठेवर आधारलेली होती. ‘उत्तरायणात, शुक्लपक्षात, दिवसाउजेडी, पूर्ण शुद्धीवर असताना मृत्यू येणे चांगले,' असे गीतेत जे आढळते, ते ह्याचसाठी. स्मृती नष्ट होता कामा नये, हा तो अट्टाहास होता. भीष्माचा स्मृतिभ्रंश कधीही झाला नाही. अर्जुनाला संमोह झाला होता. पण त्याचे स्वतःचे स्मरण त्याला कृष्णाने करून दिले, व अर्जुनही स्वकर्तव्याच्या निष्ठुर स्मरणाने पूर्ण जागा होऊन म्हणतो :
 ‘नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा'
 तशा तऱ्हेची स्वधर्माची प्रखर जाणीव द्रोणाला नव्हती, व अश्वत्थाम्याला तर पूर्णपणे आत्मविस्मृती झाली होती, असे म्हणावे लागेल. स्वधर्म गेला. परधर्मही साध्य झाला नाही, अशी त्याची स्थिती होती. ब्राह्मण म्हणून तो जन्माला आला होता व बापाने मिळवलेल्या राज्यामुळे तोही राजा... अर्थात अंकित राजा झाला असता. तो शस्त्रास्त्रे शिकला. भयंकर शस्त्रे त्याने वापरली. पण ती दुर्योधनाला जय मिळवून देण्यासाठी नव्हे, तर सर्वनाश झाल्यावर केवळ स्वतःचा सूड व स्वतःचा बचाव करण्यासाठी. ब्राह्मण्य त्यान गमावलेच होते व क्षत्रियत्व त्याला कधीही साध्य झाले नाही. मरणापेक्षाही भयंकर असे चिरजीवन त्याला जगावे लागले. आत्मविस्मृतीचे इतके अविस्मरणीय उदाहरण दुसरे नाहीच.

 डिसेंबर, १९६५