पान:Yugant.pdf/143

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त / १२५
 

 स्वतः पांडवांनी अश्वत्थाम्याला जिवंत सोडले. 'मी उत्तरेच्या मुलाला जिवंत करीन,' असे म्हणून कृष्णाने मागाहून अश्वत्थाम्याला जो शाप दिला, तो भयंकर होता. "कित्येक हजार वर्षे तू जगशील, पृथ्वीवर जंगलांतून आणि वाळवंटांतून तू वणवण भटकशील. पण कोणी जिवंत मनुष्य तुला थारा देणार नाही," हा तो शाप होता. बाकीचे सेनापती वीरमरणाने मेले. अश्वत्थामा हा मरणापेक्षाही भयंकर जिणे जगला.
 आपल्या तत्त्वज्ञानात स्मृती व मोह ह्यांना एक विशेष अर्थ व विशेष महत्त्व आहे. मनुष्याचा नाश कोणत्या टप्प्यांनी होतो, ह्याची एक कारणपरंपरा गीतेत दिली आहे. ती सर्वांना परिचित आहेच.

क्रोधाद् भवति संमोहः

संमोहात् स्मृतिविभ्रमः।

स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो

बुद्धिनाशात् प्रणश्यति।।


 उपनिषदांतही स्मृतीवर भर दिलेला आहे. (क्रतो स्मर, कृतं स्मर। इशावास्यः१७). बौद्ध वाङ्मयातही स्मृतीवर असाच भर दिलेला आहे, लहानपणापासून मरेपर्यंतच्या नित्य बदलत्या आयुष्यातील एकत्वाचा धागा स्मृती हा आहे. 'मी कोण', ह्याची नित्य जाणीव किंवा ‘मी तोच, मी तोच,' हे ज्ञान देणारी शक्ती स्मृती आहे. मी कोण? माझी कर्तव्ये कोणती? मी कुठे चाललो आहे? ही जाणीव राहते, ती स्मृतीने ! ‘मी कोण?' ह्याचे उत्तर महाभारताच्या दृष्टीने ‘आयुष्यात माझे स्थान काय?' ह्या प्रश्नाशी निगडीत आहे; व कर्तव्ये काय, ती त्या स्थानावर अवलंबून आहेत. मनुष्य जन्माला येतो, तो पूर्वजन्मीच्या खुणा घेऊन. पण त्याला त्या खुणा काय आहेत, त्याची स्मृती नसते. असामान्य माणसे उदाहरणार्थ कृष्ण- ती स्मृती घेऊन येतात. (बहूनि मे व्यतीतानि जन्मानि।भगवदगीता) ती जातिस्मर असतात. पण इतरांनी निदान या एका जन्मात तरी स्मृती अखंड ठेवण्यास जपले पाहिजे. मृत्यूच्या क्षणापर्यंत पूर्ण शुद्धीत असण्याची जी इच्छा पूर्वी दिसे, तीही ह्याच निष्ठेवर आधारलेली होती.