पान:Yugant.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त / १२३
 

गजबजलेले शिबिर सोडून कौरवांच्या ओस पडलेल्या शिबिरात त्यांना घेऊन गेला. एवढे होईपर्यंत सूर्य मावळला.
 दगा होणार हे कृष्णाने ताडले, पण नक्की कशातऱ्हेने, हे काही त्याला कळले नव्हते. तो दगा अश्वत्थाम्याचा होता. राजाला सोडून पळून गेलेले हे वीर कानोसा घेत होते. पांडव व पांचाल निघून गेले व त्यांच्या शिबिरात जयघोष चालला आहे, हे पाहून तिघेही परत दुर्योधन होता तेथे आले. डोहाच्या काठी मृतप्राय अवस्थेत मातीत दुर्योधन पडला होता. एवढा मोठा ऐश्वर्यसंपन्न राजा असा धुळीत पडलेला! भीमाने त्याला कपटाने मारले, हे ऐकून तिघेही फार हळहळले. अश्वत्थाम्याने ‘मी ह्याच्या व माझ्या बापाच्या मरणाचा सूड उगवीन,' अशी प्रतिज्ञा केली व तशाही अवस्थेत राजाकडून सेनापतिपदाचा अभिषेक करून घेतला ! बाकीचे सेनापती "ज्या वैभवाने व मानाने सेनापती झाले होते ते पाहिले, म्हणजे ह्या शेवटच्या प्रसंगाचा तिटकाराच येतो. अश्वत्थाम्याची मागणी इतकी आग्रहाची होती की, ‘नको ही कटकट', म्हणून राजाने त्याला अभिषेक केला, असेच वाटते. कौरवांचा हा शेवटचा सेना नसलेला सेनापती अभिषेक झाल्यावर राजाला तेथेच सोडून निघून गेला.
 दुर्योधनाजवळून निघून गेल्यावर तो, कृप व कृतवर्मा हे लांब जाऊन पांडवांच्या सैन्याच्या हातात सापडू नये, म्हणून रानात विश्रांतीला बसले. कृप आणि कृतवर्मा झोपी गेले, पण अश्वथाम्याला झोप येईना. द्रोणाच्या मृत्यूबरोबर अश्वत्थाम्याने बापच गमावला नव्हता, तर राज्यही गमावले होते. दुर्योधनाबद्दलच्या दुःखाने तो पिडला होता एवढेच नव्हे, तर स्वत:च्या वैयक्तिक दुःखाने व हानीने जळत होता. अशा वेळी त्याला एक दृश्य दिसले. त्या काळोख्या रात्री कावळे झोपले असताना एका घुबडाने त्यांच्यावर झडप घालून त्यांचा नाश केला. हे पाहिल्यावर अश्वत्थाम्याला 'पांडवांवर ते रात्री बेसावध असताना हल्ला करावा' ही कल्पना सुचली. त्याने ती कल्पना कृप व कृतवर्मा यांना जागे करून