पान:Yugant.pdf/140

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२२ / युगान्त

 सर्व पांडव परत रथात बसून मोठा जयघोष करीत डोहाकडे यावयास निघाले. पांडवांचा जयघोष ऐकून व त्यांच्या रथाचा आवाज ऐकून दुर्योधन परत आत जाऊन लपला व हे तिघे वीर प्राणभयाने लांब रानात पळून गेले.
 थोड्या वेळापूर्वी पांडवांना मारून टाकण्याच्या वल्गना करणारा अश्वत्थामा नुसता त्यांच्या रथाचा आवाज ऐकल्याबरोबर पळून गेला. बाप मेल्यापासून तो सूडाच्या गोष्टी बोलत होता. संतापाने जळत होता. द्रोणानंतर तीन दिवस लढाई चालली होती. पण त्याला धुष्टद्युम्नाला मारता आले नाही. समोरासमोर लढाईत तो धृष्टद्युम्नापुढे टिकू शकत नव्हता हे उघड होते. ज्या दुर्योधनाबद्दल तो एवढा कळवळा दाखवत होता त्याच्या नाशाला तोच कारण झाला. आपल्या उतावळ्या अविवेकी घाईमुळे संजयाकडून बातमी कळताच तो राजाकडे आला, व काळवेळ न पाहता दिवसा-उजेडी मोठमोठ्याने बोलून त्यानेच दुर्योधनाची लपण्याची जागा पांडवाना दाखवली. पांडव आले, तेव्हा शेवटपर्यंत आपल्या राजाशेजारी उभे राहून त्याच्या वतीने लढण्याऐवजी तो भ्याडाप्रमाणे पळून गेला.
 इच्छा नसतानाही दुर्योधनाला डोहाबाहेर यावे लागले. पांडवांनी दुरुत्तरे बोलून-बोलून, डिवचून सापाला बिळाबाहेर काढावे, तसे दुर्योधनाला बाहेर काढले व गदायुद्धात मांडीवर वार करून भीमाने त्याला खाली पाडले. शिरावर लाथही मारली, पण धर्ममध्ये पडला व त्याने दुर्योधनाची आणखी विटंबना वाचवली. दुर्योधनाला मारल्यावर धर्माने घाईघाईने कृष्णाला धृतराष्ट्राकडे पाठवून ‘धृतराष्ट्राचे व गांधारीचे सांत्वन कर व ‘राग धरू नका, आम्ही तुमचेच आहोत' असे कळव' असे सांगितले. कृष्ण हस्तिनापुरात जाऊन दोघांशी बोलतो आहे, तो आणखी जासूद आले. त्या बोलण्यावरून काहीतरी दगाफटका आहे, असा संशय कृष्णाला आला, म्हणून चाललेले बोलणे अर्धवट टाकून तो घाईघाईने परत आला व पाच पांडव, द्रौपदी व सात्यकी ह्यांना घेऊन पांडवांचे