पान:Yugant.pdf/138

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२० / युगान्त


 शल्य व शकुनी यांच्या मरणानंतर पांडवांनी कौरवसैन्याचा फडशा उडवण्यास सुरवात केली. भीतीने सैरावैरा पळणारे सैन्य आवरणे शक्य नाही, हे पाहून दुर्योधनही रणांगणातून निसटला. जाता-जाता त्याने संजयाबरोबर बापाला निरोप पाठवला“मी डोहात लपलो आहे. सर्व मारले गेले. फक्त मीच उरलो आहे." तो आपल्या लपायच्या जागी पोहोचला व डोहाखाली एका दगडाच्या कपारीत श्रांत व खिन्न असा पडून राहिला. हस्तिनापूरच्या वाटेवर संजयाला कृप, कृतवर्मा व अश्वत्थामा भेटले. तेही रणांगणातून पळून चालले होते. त्यांनी दुर्योधनाबद्दल विचारले व संजयाने त्यांना सर्व सांगितले.
 पळून चाललेल्या कौरव-सैन्याकडे दुर्लक्ष करून पांडव व पांचाल दुर्योधनाचा शोध काढून त्याला मारण्याच्या निश्चयाने निघाले. त्यांनी सर्वत्र शोधले, पण तो काही सापडला नाही. ते निराशेने शिबिराकडे परतले. आज नाही सापडला, तर उद्या तरी त्याला शोधून काढलेच पाहिजे, असा त्यांचा विचार होता. दुर्योधनाला मारल्याखेरीज लढाई संपली असे म्हणता येणार नाही, अशी त्यांची पुरेपूर खात्री होती.
 पांडवांचे रथ दुर्योधनाला शोधण्यासाठी संचार करीत असताना अश्वत्थामा व त्याचे दोघे सोबती लपून बसले होते. पांडव शिबिराकडे परतले. सर्व शांत झाले आहे, असे पाहून हे त्रिकूट बाहेर आले, व दुर्योधन लपला होता त्या डोहाकडे गेले. अश्वत्थाम्याने दुर्योधनाला हाक मारली व दुर्योधन खाली डोहात व तिघे काठावर असे त्यांचे संभाषण झाले. कृप आणि कृतवर्मा फक्त ऐकण्याचेच काम करीत होते. अश्वत्थामा मात्र ‘बाहेर ये व पांडवांशी लढ,' असे वारंवार आग्रहाने सांगत होता. लढण्याची इच्छा दुर्योधनाला मुळीच नव्हती. अश्वत्थामा मात्र सारखे सांगत होता, "दोन्हीकडचे खूप लोक मारले गेले आहेत. थोडेच शिल्लक आहेत. आता लढाई सोपी आहे. शिवाय, आम्ही तुला मदतीला आहोच".