पान:Yugant.pdf/136

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११८ / युगान्त


 ह्यानंतर द्रोण त्वेषाने लढतच राहिला, असे वर्णन आहे. म्हणजे धर्माचे भाषण ऐकल्यावर द्रोण शस्त्रे टाकून खाली बसला, अशी वस्तुस्थिती दिसत नाही. धृष्टद्युम्न त्वेषाने द्रोणावर चाल करून गेला, व द्रोणाच्या बाणाने भयंकर घायाळ झाला. ह्या वेळी भीम धृष्टद्युम्नाच्या मदतीला धावला. त्याने द्रोणाचा रथ बाजूने धरला. (द्रोणस्याश्लिष्य तं रथम् ७.१६५.२७) तो द्रोणाला असे शब्द बोलला :
 “जातिधर्म टाकून तुम्ही ब्राह्मणांनी शस्त्रे हातांत धरली नसती, तर क्षत्रियांना नीटपणे जगण्याची काही आशा होती. सर्वांशी अहिंसाव्रताने वागण्याचा ब्राह्मणांचा धर्म व आपण तर ब्राह्मणश्रेष्ठ. एका मुलाच्यासाठी तू म्लेंच्छ वगैरे फार जणांना मारलेस. ते आपल्या धर्माने वागत होते. तू मात्र स्वधर्म सोडून संहार केलास. लाज वाटत नाही का? अरे, ज्या मुलासाठी एवढे केलेस, तो तर मेलाच. धर्मराजाच्या सांगण्यावर तुझा विश्वास बसत नाही का?"
 हे शब्द ऐकून द्रोण उद्विग्न झाला व त्याचे धैर्य गळाले. ह्या अवकाशात घायाळ झालेल्या धृष्टद्युम्नाला थोडी उसंत मिळाली. थोडा दम खाऊन पुन्हा नव्या जोमाने त्याने द्रोणाच्या रथाला आपला रथ भिडवला व द्रोणाच्या रथात उडी घालून त्याने द्रोणाचे केस धरले. हा सर्व प्रकार पांडवसैन्यातून दिसत होता. अर्जुन तेथूनच मोठ्याने ओरडला, “अरे गुरुजींना मारू नकोस. त्यांचा रथ हाकून त्यांना इकडेच घेऊन ये' अर्जुन बोलत असतानाच धृष्टद्युम्नाने द्रोणाला त्या वेळी मारले नसते तरी द्रोण भीमाच्या व त्याच्या हातात पुरता सापडला होता, व त्याला बंदिवान करून पांडवांकडे आणता आले असते, ह्यात काहीच शंका नाही. द्रोण असहाय असताना रागाच्या भरात मारला गेला. मरता मरता तो मोठ्याने ओरडला 'कर्णा, कृपा, दुर्योधना, शर्थीने लढा.मी गेलो'