पान:Yugant.pdf/134

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
११६ / युगान्त


करावयास लावण्याजोगीच आहे. भीष्म पडला हे कळल्यावर दुर्योधनाच्या सैन्यात हाहाकार उडाला व 'आम्हांला कर्ण पाहिजे,आम्हांला कर्ण पाहिजे.' अशा आरोळ्या सर्वत्र ऐकू येऊ लागल्या. इतके दिवस बाजूला पडलेला कर्णही मोठ्या समारंभाने आपल्या रथातून वेगाने आला. हे सर्व वर्णन वाचीत असताना आता कर्णच सेनापती होणार, ह्याबद्दल मनाला शंका राहत नाही. पण एकाएकी सर्व रंग पालटतो. कर्णाने आपण होऊनच दुर्योधनाला सांगितले की, "सगळ्यांना पटेल आणि कोणाचेही मन मोडणार नाही, अशा माणसाला सेनापती करणे योग्य आहे. तेव्हा तू द्रोणाला सेनापती कर." आणि दुर्योधनाने द्रोणाला सेनापती केले. द्रोणाला सेनापती करण्यासाठी कर्णाने दिलेले कारण तर फारच विचार करण्यासारखे आहे. कर्ण सेनापती होण्याला काही लोकांचा विरोध असला पाहिजे, असे ह्यावरून दिसून येते. लढाईच्या सुरवातीपासूनच दुर्योधनाला ह्या पेचाने भंडावून सोडले होते. पांडवांकडे लहान कोण, मोठा कोण, क्षत्रिय कोण, अक्षत्रिय कोण, अशा भानगडी झालेल्या दिसत नाहीत. पहिल्या दिवसापासून तो शेवटच्या दिवसापर्यंत पांडवांचा सेनापती धृष्टद्युम्न होता. दुर्योधनाला पहिले दहा दिवस भीष्माच्या सेनापतित्वाखाली फुकट घालवावे लागले. नंतरही कर्णाला सेनापतिपद न देता द्रोणाला द्यावे लागले. द्रोण पडल्यावर कर्णाला सेनापती केला; पण त्याही वेळी शल्य दुखावला गेला असावा, असे दिसते, म्हणजे दळभार मोठा, पण आपल्या तोडीचे राजेलोक आणि स्वत:च्या कुळातील वृद्ध माणसे ह्यांच्या मानापमानापायी दुर्योधन जेरीस आला एवढे खरे. भीष्मामागून द्रोण सेनापती झाला, तो अशा तऱ्हेने.
 भीष्माच्या जिवंतपणी सारखी भीष्माचीच री ओढणारा द्रोण लढाईच्या वेळी मात्र अगदी निराळाच दिसतो. भीष्माचे नाते अन्नदात्याचे होते. दुर्योधनाचे नाते शिष्याचे आणि अन्नदात्याचे होते. ह्या नव्या अन्नदात्याला आपली स्वामिभक्ती दाखविणे हे