पान:Yugant.pdf/133

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
युगान्त /११५
 

असे दिसते. कारण राजसभेत निरनिराळ्या वेळी भीष्माच्या मागोमाग त्याचीही भाषणे घातलेली आहेत. भीष्म जे म्हणेल, त्याला द्रोणाने दुजोरा द्यावा, अशा प्रकारची ती भाषणे होती. पण भीष्म ज्या कळवळ्याने भांडण मिटवून कुरुकुलाचे रक्षण करू बघत होता, तो कळवळा द्रोणाच्या मनात दिसत नाही. उलट युद्धाच्या वेळी तर तो सर्वस्वी कौरवांच्या बाजूचा होता, असेच दिसते.
 द्रोणाचा मुलगा अश्वत्थामा. तोही शास्त्रांत पारंगत न होता शस्त्रांत पारंगत झाला. गुरुजी काही शस्त्रे आपल्यापासून चोरून ठेवून ती अश्वत्थाम्याला शिकवतात, अशी अर्जुनाच्या मनात शंका होती. ह्या शंकेमुळे की काय, अर्जुन आणि अश्वत्थामा ह्यांच्यामध्ये उघड नाही, पण प्रच्छन्न स्पर्धा होती. द्रोणाने अर्जुनाला परोपरीने सांगितले की, 'माझी विद्या मी तुला सर्वात अधिक दिलेली आहे.' अर्जुनाचे समाधान झाले किंवा नाही हे कळत नाही. एवढे मात्र खरे की, दोघेही पितापुत्र पांडवांच्या विरुद्ध लढले.
 लढाई करू नये, असे वाटण्याचे अर्जुनाचे मुख्य कारण म्हणजे भीष्म व द्रोण ह्यांच्याशी युद्धाचा प्रसंग येऊ नये हे. भीष्माचे वय लढाईच्या वेळी नव्वद ते शंभर वर्षांचे असावे. आणि द्रोणाचे वय द्रुपदाच्या बरोबरीचे म्हणजे अर्जुनाच्या स्वतःच्या वडिलांच्या इतके,असे म्हणावयास हरकत नाही. अर्जुनाचे वय लढाईत पस्तीस होते. त्याच्यापेक्षा त्याचे गुरु निदान वीस वर्षांनी तरी, म्हणजे बरेच वृद्ध होते. अर्जुनाने भीष्माचा व द्रोणाचा पराभव विराट गोग्रहणाच्या वेळी केलेला होता. हे दोन्ही योद्धे अर्जुनाला भारी नव्हते, पण अवध्य होते. एक आजोबा म्हणून, व दुसरा गुरू म्हणून.
 भीष्मपर्वात दहा दिवस युद्ध चालून कोणी विशेष मारले गेले नाहीत. ती लढाई लुटुपुटीची होती. वेळ काढून कौरव-पांडवांना लढाईपासून परावृत्त करावयाचे, असा भीष्माचा डाव होता. ह्याच्या उलट द्रोणाच्या सेनापतित्वाचे तीन दिवस अतिशय मोठ्या लढाईत गेले.
 द्रोणाला सेनापतिपद कसे मिळाले, ही हकीकत विचार