पान:Yugant.pdf/131

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
युगान्त / ११३
 

विचित्र आहे. जनमेजयाच्या सर्पसत्रापासून त्याचा आरंभ आहे, व सर्पसत्र थांबल्यावर व्यासशिष्य वैशंपायन पूर्वजांच्या युद्धाची कथा जनमेजयाला सांगतो आहे, असे वर्णन आहे. परीक्षिताचा तक्षकाकडून अंत व बापाचा सूड घेण्यासाठी जनमेजयाचे सर्पसत्र ह्या दोन प्रकरणांत भृगकुलातील ब्राह्मणांच्या कथांचे एक लांबलचक जाळे विणले आहे. त्या सर्व कथा संपेपर्यंत मुख्य कुरुवंश-कथनाला व महाभारतकथेला सुरुवातच होत नाही. परिक्षिताने एका ब्राह्मणाची चेष्टा केली व त्याने 'तुला तक्षक मारील,' असा शाप दिला, वगैरे कथा पाल्हाळाने सांगितल्या आहेत. वास्तविक पाहता परीक्षिताचा आजा जो अर्जुन त्याने कारण नसताना खांडववनदाहाच्या वेळेला तक्षकनागकुलाचा भयंकर नाश केला होता, ते वैर लक्षात ठेवून तक्षकाने परीक्षिताला मारले व परीक्षिताचा मुलगा जनमेजय ह्याने सर्पसत्र केले, अशी ही सरळ-सरळ तीन पिढ्यांच्या वैराची कथा आहे. तीत घुसडलेल्या सर्व ब्राह्मणकथा मागाहून घातलेल्या असाव्यात. भृगकुलाच्या हाती कधीतरी महाभारतकथा गेली असावी व त्यांनी ठिकठिकाणी आपल्या कुळातील पुरुषांच्या गोष्टी घुसडून दिल्या असाव्यात. हे कै. सुखटणकरांनी आपल्या लेखांतून फार उत्तम तऱ्हेने दाखवले आहे. आतापर्यंत उल्लेखलेल्या ब्राह्मणांच्या सर्व गोष्टी भृगुकुलातील पुरुषांच्या गोष्टींपैकीच आहेत. महाभारतकथेशी त्यांचा काही संबंध नाही. त्या सर्व काढून टाकल्या, तर मूळ कथेच्या सौंदर्यात, सुटसुटीतपणात व ओघात भरच पडते. म्हणून ह्यांपैकी कोठच्याही गोष्टीचा विचार करण्याचे कारण नाही.
 ज्या व्यासांनी महाभारत लिहिले वा शिष्यांना सांगितले, आणि कौरव व पांडव हे ज्यांचे वंशज, त्या व्यासांचाही महाभारतकथेशी संबंध वरवरचाच आहे. अधून-मधून ते प्रकट होतात, पांडवांना पांचालाला जावयास सांगतात, दुर्योधनाला उपदेश करतात, गांधारीचा संताप आवरतात, अश्वत्थाम्याची निर्भर्त्सना करतात, यादवक्षयानंतर अर्जुनाचे सांत्वन करतात, पण एकदा सत्यवतीच्या