पान:Yugant.pdf/130

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११२ / युगान्त


 त्याच प्रमाणे कर्ण शूर म्हणून गाजलेला पण त्याचा अर्जुनाकडून पराभव झाला, ह्याला काहीतरी कारण चिकटवायला परशुराम त्या कथेत आणला आहे. ह्याही कथेत कर्ण परशुरामापेक्षा सरस वाटतो. गुरूने दिलेली विद्या व ती विद्या फुकट घालवणारा शाप या दोहोंचाही स्वीकार बिचारा कर्ण मुकाट्याने करतो. ह्याही कथेचा विचार करण्याचे कारण नाही. अर्जुनाने शेवटच्या लढाईखेरीज विराटाच्या गोग्रहणाच्या वेळी कर्णाचा पराभव करून त्याला पिटाळून लावले होते. शेवटच्या लढाईत त्याने कर्णाचा पराभव केला, ह्यात लोकविलक्षण असे काहीच नव्हते. फक्त अर्जुनाकडूनच नव्हे, तर इतरांकडूनही कर्णाचा पूर्ण पराभव त्या पूर्वी झालेला होता. घोषयात्रेच्या वेळी गंधर्वांनी दुर्योधनाला पकडून नेले, त्या वेळी कर्णही मार खाऊन जीव बचावून कसाबसा निसटून पळून गेला होता. तो पुरता भिऊन गेला होता, असेही वर्णन आहे. पण कर्ण हा अतिशय मोठा योद्धा होता व परशुरामाचा शाप नसता, तर त्याचा पराभव झाला नसता, हे दाखवण्यासाठी ही कथा रचलेली आहे.
 व्यासाच्या निरनिराळ्या शिष्यांनी थोड्या निरनिराळ्या तऱ्हांनी महाभारताची कथा सांगितली आहे, अशी आख्यायिका आहे. सध्या आपल्यापुढे जे महाभारत आहे, ते मुख्यत्वे वैशंपायनाने सांगितलेले आहे, अशीच कथा जैमिनीने सांगितली असे म्हणतात. कौरव-पांडवांचे भांडण झाले, या गोष्टी जैमिनीलाही सांगाव्या लागल्या; पण त्याने कथेतील बराचसा भाग कौरवांच्या बाजूने लिहून पांडवांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला. जैमिनीचे जे अश्वमेध-प्रकरण सापडतं, त्यात ठिकठिकाणी अर्जुनाचा पराभव होऊन त्याला श्रीकृष्ण व इतर सोडवतात असे दाखवले आहे. कर्णाचा पराभव होऊन तो अर्जुनाच्या हातून मारला गेला, ही गोष्ट उघड होती. पण ह्या पराभवामुळे कर्ण, अर्जुनापेक्षा कमी ठरेल, म्हणून परशुरामशापाचं प्रकरण घडल्यासारखे वाटते. येथेही मुख्य गोष्टीला पोषक असे कथेत काही नाही.