पान:Yugant.pdf/124

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०५ / युगान्त
 


 एकदा धर्मराजाच्या स्वप्नात जनावरे (हरिणे ?) आली व त्यांनी सांगितले, “राजा, तुम्ही जनावरांचा एवढा संहार चालविला आहे की लौकरच आम्ही नष्ट होण्याच्या मार्गाला लागणार आहोत. तुम्ही दुसऱ्या वनात जा, आम्हांला थोडी उसंत मिळू द्या, आमची वीण वाढू द्या, मग परत या' हे ऐकून धर्म भावांना घेऊन दुसऱ्या वनात गेला. ज्या पांडवांना जनावरांचा निर्वंश होऊ नये अशी समज होती, त्यांनी खांडववनात इतका क्रूर संहार कसा केला? खांडववनात संहार कृष्णार्जुनांनी केला, धर्माने नव्हे, असे एक उत्तर व जनावरांचा निर्वंश न करण्यामागे दया नसून धोरण होते, हे दुसरे कारण.
 जगात सर्व समाजांतून जनावरे व पक्षी अशा वन्य प्राण्यांच्या शिकारीविषयी काटेकोर नियम आहेत. जनावरांची पैदास ज्या ऋतूत होते, त्या ऋतूत जनावरे मारू नयेत; गाभण मादीला मारू नये,लहान लहान जनावरांना मारू नये; एक-ना-दोन, अगणित नियम आहेत. हरिणांच्या शिकारीचा हंगाम एक, तर तित्तिरपक्षी मारण्याचा दुसराच. अशाच तऱ्हेचे नियम महाभारतकालापासून किंवा या पूर्वीपासून आपल्याकडेही असावेत, असे दिसते. गाभण मादी मारू नये असा नियम हेाता. ज्या क्रर कृत्यामुळे कळवळा येऊन वाल्मीकीला काव्य स्फुरले, तेही कृत्य नुसते पक्षी मारण्याचे नव्हते, तर विणीच्या दिवसांत एकमेकांशी क्रीडा करणाऱ्या जोडप्यापैकी एकाला मारण्याचे (यत् क्रौंचमिथुनादेकमवधीः काममोहितम्।) कृत्य होते. हे सर्व मृगयेचे नियम होते; पण आपल्यापैकी नव्हेत अशा माणसांना मारण्याबद्दल नियम नव्हते. जनावरांना आज जिवंत ' तरी इच्छेला येईल तेव्हा मारता येते. पण माणसांना जिवंत ठेवले,दास म्हणून जरी जिवंत ठेवले, तरी माणसा-माणसांच्या व्यवहारात दासाचे म्हणून काही क्षुद्रतम का होईना, पण अधिकार निर्माण होतात. अरण्य ज्यांच्या मालकीचे, त्यांना जिवंत ठेवणे तर जास्त धोक्याचे. जितांना दास म्हणून ठेवणे म्हणजेही धोका मोठा.