पान:Yugant.pdf/123

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०४ / युगान्त

एलापत्र हे ऐरावत शब्दाचेच प्राकृत रूप आहे. ज्या ठिकाणी नाग राहत, ते त्यांच्या मालकीचेच होते. आर्य-राजाला आपल्या प्रजेसाठी रान जाळून शेतजमीन द्यावयाची, तर आधीच्या मालकाला नष्ट करण्याची कोशीस करावी लागे का? दुसरा विचार मनात येतो का, रानातली माणसे व जनावरे ही सर्वच शिकारीला योग्य, अशी कृष्णार्जुनांची भूमिका होती का? कृष्णार्जुनांनी केलेल्या प्राणिसंहाराचे रसभरित वर्णन ह्या तर्काला जुळते आहे.
 क्षत्रियाचे ब्रीद शरणागताचे रक्षण, क्षत्रियाचे ब्रीद बरोबरीच्यांशी युद्ध, क्षत्रियाचे ब्रीद निरुपक्रोश, (=कोणाचा तळतळाट न घेणे). हे सर्व ह्या संहाराच्या प्रसंगी कोठे नाहीसे झाले होते ? बरोबरीच्यांशी युद्ध, निरुपक्रोश हे सर्व नियम स्वतःच्या समाजापुरते होते. आपल्या समाजाबाहेरचा जो असेल, त्याला अशी मुल्ये लावायची नाहीत, असा ह्या कृतीच्या मुळाशी दंडक असणार. परत एकदा ऐतिहासिक घटनांची आठवण होते. जी आपल्या समाजातील नव्हेत, अशा माणसाचा संहार तैमूरलंग, चेंगीझखान ह्यांनी नाही का केला? एकोणिसाव्या शतकात जनावरांची करावी तशी शिकार गोऱ्या लोकांनी टॅस्मनियातील वन्यमाणसांची केली, असा अगदी ताजा इतिहास आहे. नीतिनियम सामाजिक असतात. ते बहुधा त्या-त्या समाजात समाजांतर्गत व्यक्तींपुरते मर्यादित असतात. समाजातल्या समाजात परत त्या-त्या वर्गाचे, जातींचे, कुटुंबाचे, असे वागण्याचे नियम असतात. स्वकीय-परकीय, आपण-इतर असे नेहमीचे व्यवहाराचे विश्व असते. स्वकीय वा आपला समूह ह्यांच्याशी वागण्याचे नियम परकीयांना लागू पडत नाहीत. विश्वकुटुंब वृत्तीचे लोक अपवादात्मक, आणि कृष्ण व अर्जुन खासच त्यांपैकी नव्हते. ते दोघेही निरनिराळ्या अर्थांनी त्या व क्षत्रियांत गाजलेले होते. एक मुत्सद्दी म्हणून. दुसरा योद्धा म्हणून. अचाट संहाराने त्यांचे मन हेलावलेले दिसत नाही. महाभारतात ‘मृगस्वप्नभय' म्हणून प्रकरण आहे. पांडव एका वनात राहत होते. रानातसुद्धा पांडवांचा परिवार मोठा होता. सर्वांचे पोट भरण्यासाठी व मजा म्हणूनही पांडव रोज खूप शिकार करीत.