पान:Yugant.pdf/122

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०३/युगान्त
  वाणी व हरहुन्नरी नागर लोक राजधानीत असत, तर शेतकरी राजधानीच्या बाहेर गावांतून असत. राने जाळणे, किंवा तोडणे व शेतकऱ्यांना ते वसाहतीला देणे हे राजाच्या कर्तव्यापैकीच एक होते. तेच कृष्णार्जुनांनी केले. पण हे वन जाळण्यास मोठा विरोध होता असे दिसते. हा विरोध कोणाचा? एकंदर वर्णनावरून असे दिसते की, खांडववन म्हणजे काही निर्मनुष्य अरण्य नव्हते. कोणाचीच मालकी नाही अशी ही भूमी नव्हती. तेथे ‘तक्षक' नावाच्या नागाचा परिवार होता. त्याच्याच घरी ‘मय' नावाचा मोठा कारागीर राहत होता. 'शार्ङ्गी' नावाची पक्षिकुलाचे नाव असलेली व एका ब्राह्मणाशी लग्न झालेली बाई तेथे राहत होती. हे नाव असलेल्या व्यक्तींखेरीजही इतर खूपच व्यक्ती होत्या. त्यांची नावे सर्पांची, पक्ष्यांची अशी होती. त्याशिवाय पशूही होते. हे खरोखर पशू होते, का पशुकुलाचे नाव असलेली (उदाहरणार्थ; लांडगे, वाघ, मोर, वगैरे) माणसे होती हे कळणे शक्य नाही. रान जाळताना त्या सर्वांना कृष्णार्जुनांनी मारले. वर सांगितल्याखेरीज इतर कोणालाही जिवंत सोडले नाही. परत प्रश्न मनात येतो, ‘हा संहार का?' रान जाळून जमीन वहितीला द्यावयाची असेल, तर त्या जमिनीला कोणी मालक असता कामा नये. म्हणन त्या भूमीत वंशपरंपरा राहणाऱ्या सर्वांचा संहार करावा लागला, असे तर नव्हे ? अरण्यात वंशपरंपरा दीर्घकाळ राहणारे लोक मुख्यत्वे 'नाग' नावाचे होते. महाभारतकथेत 'शेष', 'वासुकी’ ‘धृतराष्ट्र' ‘ऐरावत’, ‘एलापत्र’, ‘तक्षक' व 'कर्कोटक' हे निरनिराळ्या नागकुलांचे मुख्य होते व त्याना नागराज असे विशेषण दिलेले आढळते. आर्य ज्या भूमीत पहिल्याने आले (पंचनद्यांचा प्रदेश), तोच ह्या नागकुलांचा प्रदेश होता. मात्र नाग नदीकाठाने अरण्यात राहत असत, तर आर्य उघडया माळावरती वस्ती पसंत करीत. वासुकी भोगावतीकाठी होता. ऐरावत इरावतीकाठी होता. तक्षक यमुनेकाठी कुरुक्षेत्राजवळ होता.