पान:Yugant.pdf/119

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०० / युगान्त

सर्व राजांना जिंकले, आणि मग धर्माने राजसूय यज्ञ केला. हस्तिनापूरच्या नातेवाईकांनाही मोठ्या आग्रहाने यज्ञाचे निमंत्रण दिले. त्या वेळच्या सर्व राजांसमोर पांडवांच्या वैभवाचे व विक्रमाचे प्रदर्शन झाले, पण सर्वांत दाहक प्रदर्शन झाले ते चुलत-भावांपुढे. मयसभा अशी बांधली होती की, पाणी आहे तेथे साधी जमीन वाटावी व जमीन आहे तेथे पाण्याचा प्रवाह वाहतोसे वाटावे. दार म्हणून पलीकडे जायला पहावे, तो डोके भिंतीवर आपटावे. रत्नांचे पशुपक्षी, झाडे इतकी सुंदर बनवली होती की, खऱ्याचा भास व्हावा. दुर्योधन पाय घसरून भिजला, त्याचे डोके भिंतीवर आपटले, व पांडव आणि द्रौपदी त्याची ही फजिती पाहून खदखदा हसली. पांडवांनी नुसते आपले वैभवच दाखविले असे नाही, तर जाणूनबुजून दुर्योधनाचा सर्वांदेखत अपमानही केला.
 लौकरच फासे उलटे पडले. पांडव सर्वस्व हरले व तेरा वर्षे वनात गेले. परत येऊन युद्ध जिंकल्यावर ते वाडवडिलांपासून आलेल्या हस्तिनापुरात राहिले; इन्द्रप्रस्थाला गेले नाहीत. यादववंशाचा नाश झाल्यावर ज्या उरल्या-सुरलेल्यांना घेऊन अर्जुन आला, त्यांत कृष्णाचा नातू वज्र होता. पांडव महाप्रस्थानाला गेले, तेव्हा परिक्षिताला हस्तिनापूर देऊन वज्राला इन्द्रप्रस्थाचे राज्य दिले. परत इन्द्रप्रस्थाचे नाव ऐकू येत नाही व मयसभेचे वर्णन एकदा सभापर्वात येऊन गेल्यावर परत तिचा उल्लेखही नाही.
 ही झाली खांडव जाळण्याची कथा. तीत विचार करायला लावण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. एवढे मोठे वन का जाळले? आतील सर्व प्राणी, नाग, पक्षी वगैरे निःशेष का मारले? स्वतःला 'बीभत्सु'* म्हणवणाऱ्या अर्जुनाने ही क्रूर शिकार का केली?
 यमुनेच्या काठी मजेत वनविहार करावयास गेले असताना


 
  • 'बीभत्सु' ह्याचा अर्थ अतिशय क्रूर कर्म करणारा असा आहे. अर्जुन स्वतः असे सांगतो की, "मी लढत असताना कधीही बीभत्स कृत्य करीत नाही, म्हणून मला 'बीभत्सु' हे नाव पडलेले आहे." अर्जुनाने आपल्या स्वतःच्या सहा नावांचे स्पष्टीकरण केले, त्या वेळचा विराटपर्वातील हा प्रसंग आहे. (४.३९.१६)