पान:Yugant.pdf/118

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

युगान्त / ९९

अमाप खातो. माझी तृप्ती करा." त्यांनी त्याला अन्न देऊ केले असता त्याने आपले अग्निरूप प्रकट करून सांगितले, "मला आतील सर्व प्राण्यांसकट खांडववन खाण्यास द्या. ते मला जाळू द्या. जेव्हाजेव्हा मी ते जाळण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा-तेव्हा इन्द्र पाऊस पाडून माझा प्रयत्न हाणून पाडतो." कृष्णार्जुनांनी हे काम पार पाडण्याचे कबूल केले, पण अशी अट घातली की, उत्तम रथ व शस्त्रे अग्नीने पुरवावी. एक दिव्य रथ, पांढरे शुभ्र व वायुवेगाने धावणारे घोडे व गांडीव धनुष्य अग्नीने अर्जुनाला दिले आणि कृष्णाला चक्र व इतर आयुधे दिली. अरण्य जळत असताना दोघांनी रथात दोन बाजूंकडून एवढा कडेकोट बंदोबस्त ठेवला की, आगीने भिऊन पळणाऱ्या प्राण्यांना निसटून जाण्यास छिद्रच सापडेना. भोवती रथ पिटाळून त्यांनी भयंकर संहार केला. ज्यांना आत पिटाळले, ते प्राणी होरपळून मेले. जे बाहेर आले, ते ह्या दोघांच्या शस्त्रांना बळी पडले. नागराज तक्षक कुरुक्षेत्राला गेला होता म्हणून वाचला. त्याचा मुलगा मोठ्या युक्तीने स्वतःचा प्राण देऊन आईने वाचवला. तक्षकाच्या आसऱ्याने तक्षकाच्या घरी राहणारा 'मय' नावाचा असुर 'अर्जुना धाव' अशी हाक मारीत आला. त्याला अर्जुनाने जीवदान दिले व एका ब्राह्मणाची शाङ्गी नावाच्या पक्षिणीपासून(?) झालेली मुले वाचवली. तक्षकाच्या घराण्यातील तेथे असलेले 'नाग' व इतर पशुपक्षी सर्व मारले गेले. इन्द्र व देव अरण्याचे रक्षण करावयास धावले, तेव्हा कृष्णार्जुनांनी त्यांचा पराभव करून त्यांना हाकलून लावले. "तुझा मित्र तक्षक वाचला आहे," असे सांगून देवांनी इंद्राला निकराचे युद्ध करू दिले नाही. रान आठवडाभर जळत होते व सारा वेळ अर्जुन आणि कृष्ण भोवती हिंडून प्राण्यांचा संहार करीत होते. आतील यच्चयावत् प्राण्यांचे मांस व चरबी खाऊन अग्नी तृप्त झाला व दोघा वीरांचा निरोप घेऊन गेला. प्राण वाचवले, त्याची परतफेड म्हणून नाना देशांतून साहित्य आणून मयाने इन्द्रप्रस्थ राजधानीत मयसभा बांधली. ही सभा बांधल्यावर धर्माच्या भावांनी चारी दिशांस जाऊन