पान:Yugant.pdf/116

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युगान्त / ९७

सहामयसभा काही वास्तू मोठ्या थाटात सुरू होऊन अपशकुनी व दुर्दैवी ठरतात. आतून उद्ध्वस्त झालेला, फुटलेल्या बुरुजातून आतले मातीचे भरताड दाखवीत असलेला शनिवारवाडा हे माझ्या डोळ्यांसमोरचे सर्वांत अर्वाचीन उदाहरण आहे. वाडा बांधणा-याला व त्याच्या मागाहून येणा-या कर्त्या पुरुषांना त्या वाड्यात सुख लाभले नाही व मूळ वास्तूही हीन-दीन अवस्थेत कशीबशी तग धरून आहे. पण ह्या वाड्यात निदान पाच पिढ्या नांदल्या. ह्याहीपेक्षा वैभवशाली, अपशकुनी व क्षणभंगुर वास्तू आज महाभारत वाचताना डोळ्यांपुढे उभी राहते आहे. ती म्हणजे इंद्रप्रस्थ किंवा खांडवप्रस्थ नगरातील मयसभा व खुद्द ते नगरही. पांडवांनी आपल्या संपत्तीचे नेत्रदीपक पण हृदयदाहक प्रदर्शन ह्या सभेत केले. ते प्रदर्शन क्षणभंगुरच ठरले. सभा बांधल्यावर पांडव तेरा-चौदा वर्षेही इन्द्रप्रस्थाला राहिले नाहीत. क्रौर्यात मयसभेचा जन्म झाला. फाशांच्या उन्मादात तिचा अंत झाला.
 महाभारतात मयसभेच्या जन्माची कथा सांगितलेली आहे ती अशी : द्रौपदीच्या लग्नानंतर पांडवांचे पारडे एकदम जड झाले.