पान:Yugant.pdf/115

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
९६ / युगान्त

गांधारीला सारा वेळ घालून पाडून बोलणारा भीम. द्रौपदी ज्या अर्थाने पार्थिव होती, त्या अर्थाने तोही पार्थिव होता. ती भूमिकन्या होती तसा तो भूमिपुत्र होता...
 द्रौपदीला काहीतरी फरफटल्याचा, मोठ्याने श्वासोच्छ्वास घेतल्याचा आवाज आला. तिचे सर्वांग भीतीने शहारले. ती स्वस्थपणे मरणाची वाट पाहत होती... कोठचे क्रूर जनावर येत असेल बरे? तरस का? इतके दिवस चालताना ह्या माळावर जनावरे दिसली नव्हती. अंगाचे लचके न तोडता ते जनावर नरडीचा घोट एकदम घेईल, तर बरे. तिने डोळे घट्ट मिटले. नवे अनामिक संकट कोसळण्याच्या क्षणाची वाट पाहताना एकदम तिच्या डोळ्यांवर छाया आली. सूर्यामध्ये नि तिच्यामध्ये काहीतरी पडदा आला होता. मंद खोल आवाजात हाक आली, "द्रौपदी!" तो भीमाचा आवाज होता. द्रौपदीने आश्चर्याने पण कष्टाने हात बाजूला केले व डोळे उघडले. भीम तिच्या तोंडावर आपल्या शरीराची सावली करून होता. तोच फरफटत, धापा टाकीत, कष्टाने मधली दहा-पंधरा पावले ओलांडून तिच्यापर्यंत आला होता. वाटेत अर्जुन, नकुल, सहदेव मेलेले दिसले तेव्हा द्रौपदीही त्याच अवस्थेत दिसणार, असे त्याला वाटले होते. पण डोळे मिटून स्वस्थ पडलेली द्रौपदी त्याच्या येण्याने घाबरली, शहारली. ही तिच्या जिवंतपणाची निशाणी त्याने आपल्या डोळ्यात टिपली. "काय करू तुझ्यासाठी ?" त्याने अडखळत विचारले. नेहमीचाच आयुष्यभर विचारलेला, पण ह्या परिस्थितीत अगदी निरर्थक, गैरवाजवी प्रश्न होता तो, द्रौपदी प्रसन्न हसली. भीमाचे तोंड आपल्या तोंडाजवळ आणून आपल्या शेवटच्या श्वासाने ती म्हणाली, "पुढल्या जन्मी पाचांतला थोरला भाऊ हो, भीमा! तुझ्या आसऱ्याखाली आम्ही सारी निर्भयपणे आनंदात राहू."

 ऑक्टोबर, १९६३