पान:Yugant.pdf/113

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९४ / युगान्त


 द्रौपदी पडली खरी, पण कोसळून मरून पडली नाही. तिला भयंकर ग्लानी आली होती. पाऊल पुढे उचलेना. पडल्यावर तिने भीमाची व धर्माची प्रश्नोत्तरे ऐकली. हे महाप्रयाण होते. या प्रवासा कोणी कोणासाठी थांबायचे नसते. आयुष्याची संगत संपलेली होती, डोक्यावर हात ठेवून ती मरण्याची वाट पाहत होती. पण तिला शुद्ध होती. धर्माच्या शब्दांनी विचारांची चक्रे फिरू लागली. वर्षानुवर्ष जगलेल्या आयुष्याचा चित्रपट शेवटच्या काही क्षणांत तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिला.
 धर्माच्या वाक्यातील जखम तिला जाणवली. धिक्कारही जाणवला. आयुष्यात प्रथमच मनापासून तिला राजाची कीव आली. पुष्कळदा, विशेषतः अरण्यवासात, तिने राजाच्या दैन्यावस्थेबद्दल हळहळ बोलून दाखवली होती. त्या हळहळीच्या शब्दांत काहीतरी नव्या वादाची सुरवात होती. दैन्याकडे बोट दाखवून राजाच्या लढाऊ वृत्ती जागृत करण्याचा तो प्रयत्न होता. एक प्रकारचे डिवचणेच होते ते. राजाने त्या प्रयत्नांना कधीही दाद दिली नव्हती. शक्य तितक्या सौम्य शब्दांनी तो तिचे बोलणे खोडून काढी. आज मात्र एका वाक्यात त्याच्या आयुष्यातील वेदनेला वाचा फुटली होती. कधीही शब्दाने न दुखवणाऱ्या राजाने तिच्या मरणाच्या क्षणी त्याच्या मताने तिच्या वर्तनातील उणीव दाखवली. राजाच्या वैफल्याची जाणीव होऊन द्रौपदीला क्षणभर वाईट वाटले,पण क्षणभरच. राजाच्या धिक्काराची जाणीव होऊन ती चमकली, पण तेही क्षणभरच. ती मनात हसली. तिला स्वयंवराच्या दिवसाची आठवण झाली. अर्जुनाने पण जिंकल्यावर एकापाठोपाठ एक ह्याप्रमाणे पाच जणांशी तिचे लग्न लागले, तेव्हा आपल्याला काही वेदना झाल्या हे राजाला कळले नसेल, असे थोडेच? आपण मन मारले. कृतीत तरी पाचांत कधीही भेदभाव केला नाही.