पान:Yugant.pdf/112

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त / ९३
 

 अरण्यपर्वात तिला ‘पंडिता' हे विशेषण लावलेले आढळते. स्त्रियांनी पंडिता असावे हे महाभारतकालीन क्षत्रियांना मोठेसे रूचत असावे असे दिसत नाही. गांधारी, कुंती पुत्रांना उपदेश करतात. त्या वृद्ध, केल्या-सवरल्या स्त्रिया होत्या. त्यांनी मुलांना चार गोष्टी सांगणे अपेक्षित होते. तरण्या-ताठ्या बाईने वडीलमाणसांपुढे शहाणपण दाखवणे हे अगदीच चुकले. आपल्या हातून चूक झाली, हे द्रोपदीला उमगलेच नसावेसे दिसते. राजाने त्या चुकीमुळे आपल्याला झालेली जखम तिला कधी उघडी करून दाखवली नाही, राजाने तिला जाणीव दिली, ती दुसऱ्याच एका जखमेची व ती इतकी उघड होती की, इतर सर्वांनाच नव्हे, तर खुद्द प्रांजळ बुद्धीच्या द्रौपदीलाही ती पटावी.
 यादवांच्या, विशेषत... श्रीकृष्णाच्या अंतानंतर पांडवांना पृथ्वीवर राहणे शक्य नव्हते. सर्व आवरासावर करून पांडव शेवटच्या यात्रेला निघाले. अर्थात द्रौपदीही त्यांच्याबरोबर होतीच. गंगेचे खोरे ओलांडले, हिमालयाचा प्रदेश ओलांडला व एक निर्वृक्ष माळावर ती पोहोचली. इतस्ततः दगड पसरलेले होते. दसरे काही नाही.महिने-न-महिने एकामागून एक सहा जणे चालली होती. एकाएकी द्रौपदी खाली पडली. भीम थांबला. त्याने वेड्यासारखा प्रश्न विचारला, “ही का बरे पडली?"
 इतके चालल्यावर तिने का पडू नये ? सहा जण जिथे चालली होती, तिथपर्यंत सर्वजणे पोहोचणार, अशी भीमाची कल्पना होती का?
"बघ रे... ही पडली रे !" भीम म्हणाला, “का बरे ती अशी पडली ?"
 “भीमा, पुढे चल. ती पडली, कारण तिने सर्वात जास्त प्रेम अर्जुनावर केले." धर्माने पुढे जाता-जाता, मागे न पाहता उत्तर दिले व आयुष्यभर मनात बाळगलेली खोल जखम उघडी करून दाखवली. द्रौपदी पडली. तिच्या पाठोपाठ दहा-पाच पावलांत इतर पडले.एकटा धर्म कुत्र्याबरोबर पुढे गेला.

० ० ०