पान:Yugant.pdf/111

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
९२ / युगान्त

शहाणपणावर व न्यायबुद्धीवर आमचा इतका विश्वास आहे की, त्याने दिलेला निवाडा आम्ही मान्य करू".
 द्रौपदीचा प्रश्न, दुर्योधनाचे हे मानभावी उत्तर ह्यांनी बिचाऱ्या धर्माचा जेवढा मर्मच्छेद झाला, तेवढा दुसऱ्या कशानेही झाला नसता. प्रश्नाचे उत्तर देणे शक्यच नव्हते. द्रौपदीचे वस्त्र फेडले गेले व नवी वस्त्रे मिळत गेली. महाभारताच्या संशोधित आवृत्तीत कृष्णाचा धावा नाही. जे होत होते, ते इतके वाईट होते की, विश्वातील शक्ती जागी होऊन तिने एका बाईचे रक्षण केले, असेच म्हणावे लागते. दुःशासन थकून, लाजून बाजूला झाला. सभागृह अशुभ, अपशकुनी आवाजांनी भरून राहिले. विदुर कळवळून उठला. आंधळ्या धृतराष्ट्राला म्हणाला, "ह्या दुष्कृत्याने भयंकर उत्पात होत आहेत, मध्ये पड, व कुळाला वाचव." धृतराष्ट्रही झाल्या प्रकाराने घाबरला. त्याने द्रौपदीला मोकळी करून वर दिले. तिने दोन वरांनी आपल्या नवऱ्यांची सुटका केली. पण शहाणपणाचा दिमाख दाखवून तिने जो प्रश्न विचारला, तो सभेत कोणालाच विशेष आवडला नाही. धर्मराजाला तर हे शल्य जन्मात विसरणे शक्य नव्हते. अरण्यात असतानाही धर्मापुढे आपले शहाणपण दाखवण्याचा तिने प्रयत्न केला. पण पांडित्यात धर्म तिच्यापुढे हार जाणे शक्य नव्हते. त्याने तिला गप्प बसवलेच. आपल्या आयुष्यात तिने लहान-मोठ्या चुका केल्या होत्या, त्या क्षम्य होत्या. पण भर सभेत पांडित्याचा आव आणून धर्माला तिने पेचात आणले होते, त्याचा अजाणता अपमान केला होता. अजाणताच, कारण तिला ज्या वेळी घालून-पाडून बोलायचे होते, त्या वेळी ती सरळसरळ बोलायची. पण अजाणता म्हणून तो क्षम्य नव्हता. आधी सभेमध्ये तरुण वधूने बोलू नये, हे तिला समजायला पाहिजे होते. ते करून वर शहाण्या-शहाण्याना जे कळले नाही ते मला कळले, हा पंडिती थाट! ह्या दोन्ही गोष्टी धर्मराजाला झोंबल्या. त्यामुळे तिच्या यशात भर पडली नाही. पण ह्या सर्व प्रसंगाने तिच्या पार्थिवतेची, आडदांड निरागसतेची जाणीव