पान:Yugant.pdf/110

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त / ९१
 


थोडासा हक्क फार प्राचीन काळापासून मान्य झालेला होता. मालकाचा दासावर हक्क व दासाचा बायकोवर हक्क, असा गुंतागुंतीचा प्रश्न होता.
 द्रौपदीचा प्रश्न वेडगळ होता. नव्हे, भयानक होता. त्याचे काहीही उत्तर आले असते, तरी तिला ते उपकारक ठरणारे नव्हते. "तुझ्या नवऱ्याचा हक्क नाहीसा होत नाही. तो दास झाला, तरी तू त्याची बायको म्हणून तुझ्यावर त्याची सत्ता राहते. तो तुला पणाला लावू शकतो," असे भीष्म बोलला असता, तर तिचे दासीपण पक्के झाले असते. “दासपणामुळे तुझ्या नवऱ्याचा तुझ्यावरचा हक्क नाहीसा होत नाही," असे भीष्म बोलता, तर तिचे हाल कुत्रा खाता ना! द्रौपदी ‘नाथवती अनाथवत्' अशी होती. तिची नाथवत्ताच मग नाहीशी झाली असती. म्हणजे ती सर्व बाजूंनी अनाथ झाली असती. पतीने टाकले, म्हणजे दीनपणे पितृगृही राहणाऱ्या स्त्रियांचा ऋग्वेदातही उल्लेख आहे (भार्यापत्त्यानुत्तेव ज्योक् पितृषु आस्ताम्). पण जिने आपणहून नवऱ्याचे नवरेपण झिडकारले, अशी बाईच तेव्हा माहीत नव्हती. अशा बाईला अशा मानाचे राहोच, पण दीनवाणे स्थानही माहेरी मिळणे शक्य नव्हते. ह्या प्रश्नाने तिने सर्वाना पेचात टाकले होते. भीष्माला मान खाली घालावी लागली.धर्मही शरमेने मेला. ह्या प्रश्नात पांडित्य नव्हतेच, पण पांडित्यापेक्षाही श्रेष्ठ असा शहाणपणा, प्रज्ञा नव्हतीच नव्हती. जे चालले होते, ते इतके हिडीस होते की, सासऱ्यांनी व दिरांनी भरलेल्या सभेमध्ये वधू म्हणून द्रौपदीने हंबरडा फोडला असता, तर गोष्टी या थराला कदाचित जात्या ना! स्वतःची सून भर सभेत ओढून आणीत असता प्रतिकार न करणे, पुरुषांच्या सभेत स्वतःच्या कुळातील वधूचा अपमान करणे ही कृत्ये मानवाच्या व अलिखित सर्वमान्य नीति-नियमांच्या इतकी विरूद्ध होती की, त्या प्रसंगी कायदेबाजपणा हा अतिशहाणपणाच ठरता.