पान:Yugant.pdf/109

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९० / युगान्त

हा अनर्थ द्रौपदीने स्वतः आपल्यावर ओढवून घेतलेला होता आणि तोही वागू नये तसे वागून. आपला शत्रू गेला, त्याच्या प्रेताकडे पाहून डोळ्यांचे पारणे फिटू दे, असे वाटणारी द्रौपदी भूमिकन्याच.
 सुभद्रेवर व अर्जुनावर जळणारी द्रौपदीही अगदी मानवी. असले दुःख तर सीतेला भोगावेच लागले नाही. तो असामान्यपणा. द्रौपदीचे हे दुःख त्या जमान्यात फारच सामान्य, पण एकत्र वागण्यात दाखवलेला संयम असामान्य, रोजच्या आयुष्यात द्रौपदीने सवतीमत्सर दाखविला, असे कुठेच दिसत नाही.
 सगळ्यांत द्रौपदीचे चुकले कुठे? धर्म धूतात हरला, त्यावेळी एका क्षुद्र दासाकडून दुर्योधनाने तिला सभेत बोलावणे पाठवले. त्यावेळी द्रौपदीने त्याच्याबरोबर निरोप पाठवला, “जा, सभेत विचारून ये. माझा पण लावायच्या आधी धर्मराज स्वतः पण लावून दास झाले होते का नाही ते” दुर्योधनाने सांगितले, “सभेत ये, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल" ती सभेत आली नाही. तेव्हा दु:शासनाने तिला ओढीत आणली. सभेत तिने रडत पण त्वेषाने तोच प्रश्न विचारला. त्या प्रश्नावर चर्वितचर्वण झाले. भीष्मालासुद्धा उत्तर देता आले नाही. कदाचित द्रौपदीच्या विरुद्ध गेले असते, म्हणून त्याने उत्तर द्यायचे टाळले असेल. कारण पांडवांची बाजू घेऊन त्याने कित्येकदा धृतराष्ट्राशी व दुर्योधनाशी भांडण केले होते. ह्या वेळी तो गप्प बसला, तो मिंधेपणाने नसून ह्या वादात शिरण्यात अर्थ नाही म्हणून, असेच वाटते. द्रौपदीचे म्हणणे होते की, एकदा धर्मराज दास झाला, स्वातंत्र्य गमावून बसला, म्हणजे ज्यावर त्याने स्वामित्व गाजवावे, असे काही राहिलेलेच नव्हते. कारण दास ‘अ-स्व'. स्वत:चे काही नसलेला असा असतो. ह्या पायरीवर आलेल्या मनुष्याला पणाला लावायला काही उरलेले नसते. मग तो मला पणाला लावणार कसा?' एका बाजूने हे बोलणे संयुक्तिक दिसले, तरी दासालासुद्धा बायको असते व तो दास म्हणून त्याचा बायकोवरचा अधिकार नाहीसा झालेला नसती हे ही खरे. एखाद्याचा दास म्हणून राहूनही दासाचा स्वतंत्र धनार्जन करण्याचा