पान:Yugant.pdf/108

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
युगान्त / ८९
 

 ह्या प्रसंगाला द्रौपदीच्या आयुष्यात तोड नाही, द्रौपदीची सर्व दुःखे व अपमान वास्तव व त्यांचे निराकरण व त्यात पडलेली भर ही सर्व व्यवहाराच्या पायरीवरील, ओढूनताणून आणलेली नव्हेत. काव्य रंगविण्यासाठी घातलेली नव्हेत. सीता भूमिकन्या, कारण पृथ्वीतून निघालेली; पण द्रौपदी खरीखुरी भूमिकन्या, कारण तिचे पाय भूमीवर, तिचे हृदय संसारात, माहेरात, सासरी, राजवाड्यात असे होते. तिचा बाणेदारपणा, तिचा स्वार्थत्याग, तिची पतिपरायणता- सर्वच वर्तन ती ज्या देशात, ज्या काळात व ज्या कुळात जन्मली, वावरली, त्यांना योग्य असे होते. ती असामान्य होती; पण ही असामान्यता सामान्यांच्या मूल्यांतूनच जन्माला आलेली होती.
 द्रौपदी आणि सीता या दोघांच्याहीकडून होऊ नये, त्या गोष्टी घडल्या आणि त्यांचे प्रायश्चितही दोघींना भरपूर मिळाले. सीतेला संभाळायला भावाला सांगून राम हरणापाठीमागे गेला. रामाची हाक ऐकून सीतेने लक्ष्मणाला त्याच्या मदतीस जाण्यास सांगितले. लक्ष्मण तिला सोडून जाईना, तेव्हा अती वाईट संशय घेऊन ती त्याला बोलली. ह्याचा परिणाम म्हणजे रावण तिला पळवू शकला. कांचनमृगाचा सबंध कटच तिला पळविण्यासाठी रचलेला. पाठीमागे गेले, तर शूर्पणखेला हसून तिची चेष्टा तिने केली होती, त्याचाही हा परिणाम म्हणता येईल. द्रौपदी दुर्योधनाला चारचौघांत हसली होती. पाणी तिथे कोरडी जमीन, जमीन तिथे पाणी, असे वाटून दुर्योधन मयाने बनवलेल्या अद्भुत राजवाड्यात फजीत झाला होता. सर्वांत जास्त अपमान झाला, तो द्रौपदीच्या असंस्कृत हसण्याचा!
 कीचकवधानंतर द्रौपदीनेच त्याच्या वधाची बातमी मोठ्या दिमाखाने रक्षकांना सांगितली. गुपचूप लोकांच्या दृष्टीआड बसून असायचे; ते सोडून ती कीचकाची प्रेतयात्रा पाहत उभी राहिली; त्याच्या भावांच्या दृष्टीस पडली व त्यांनी तिला बांधून कीचकाबरोबर जाळण्यासाठी स्मशानात चालवले. हा अनर्थ द्रौपदीने