पान:Yugant.pdf/107

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८८ / युगान्त

अनुषंगाने आलेल्या आहेत. सीतेवरची खरी आपत्ती नवऱ्याने तिला टाकली ही. ती खरोखर यावयास पाहिजे होती, पण आली नाही. त्यावरून मूळ रामायणात ही कथा नव्हतीच असे वाटते. ते कसेही असो, सीता-त्यागाचा प्रसंग धरून चालले, तर सीतेला खरेखुरे दु:ख शेवटी भोगावे लागले असे दिसते. त्या दु:खाची तऱ्हाही थोडीशी संस्कृत काव्याच्या धर्तीची आहे. खोटा आळ येणे, त्याचे परिमार्जन होणे व शेवटी मीलन, अशी कथानकाची शाकुन्तलात दाखविल्याप्रमाणे बांधणी असायची. पण सीता-त्यागाचा शेवट सीतेच्या आत्मनाशात झाला. लोकांची खात्री पटावी असे दुसरे एखादे दिव्य करून तिला आनंदात राहता आले असते. पण तिने तसे केले नाही, का? ह्या प्रश्नाची उत्तरे अनेक आहेत. त्यात शिरण्याचे कारण नाही. पण ती नष्ट झाली आणि तिच्या कृत्याचा चटका सर्व भारतीय माणसांना लागून राहिला. ही आपत्ती तिच्यावर ओढवून आणण्यात ग्रंथकर्त्यांचा एक हेतू असावासे वाटते. रामायणकथाच अशी आहे की, नायक सर्वांगीण उत्तम पुरुष होता, त्याचे वर्णन 'मर्यादा पुरुषोत्तम' असे करायचे; नायक सर्व प्रसंगांतून तावून-सुलाखून निघालेला. पण अजून एक दिव्य राहिले होते. स्वतःचे प्रेम का प्रजेची इच्छा, असा झगडा करून राजा म्हटला की प्रजेसाठी वाटेल तो 'स्वार्थ' त्याग करायची त्याची तयारी पाहिजे आणि तशा तऱ्हेचा राजा राम होता, हे ह्या प्रसंगाने सिद्ध करायचे. पण दुर्दैवाने रामाने अंगिकारलेला मार्ग उत्तम होता, हे निरपवाद ठरले नाही.
'स्वार्थ'त्याग म्हणजे एका निरपराध जीवावार अन्याय का? रामाला राज्य सोडता नसते का आले? सीतेचा त्याग ही गोष्ट काही चांगली झाली नाही, असे कालिदास, भवभूती वगैरे महान कवींनाही वाटले. म्हणजे त्या एका प्रसंगाने रामाच्या यशाला गालबोट लागले आणि जी सीता केवळ रामाची छाया होती, तिला स्वतंत्र व्यक्तिमत्व, स्वतंत्र दु:खे, अपमान व त्यांचे स्वतंत्रपणे निराकरण करण्याचा संधी लाभली.