पान:Yugant.pdf/106

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
युगान्त / ८७
 


जुनी उट्टी फेडली गेली. त्यातच द्रौपदीची उट्टी फेडली फक्त भीमाने. कर्णार्जुनांचे वैर व स्पर्धा जुनी होती. त्यांच्या युद्धाला कोणी दुसरे निमित्त नव्हते. वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटणीवरून एकत्र कुटुंबात जी भांडणे भारतात अतिप्राचीन कालापासून चालत आली, त्यांतले हे एक मोठे भांडण झाले, द्रौपदीमुळे ते नव्हे. द्रौपदीला युद्ध हवे होते पण पांडव पितृप्रधान भारतीय संस्कृतीचे सच्चे वारस होते; ते काही बायकोच्या इच्छेप्रमाणे झुलणारे नव्हते!
 शिष्टाईच्या वेळी कर्णाला फोडण्यासाठी कृष्णाने त्याला राज्याची व द्रौपदीचीसुद्धा लालूच दाखविली. ह्या हीन सौद्याची वार्ताही द्रौपदीला नव्हती. महाभारताने कुठचीच भूमिका आदर्श रंगवलेली नाही. वास्तव चित्रणात प्रत्येकासंबंधी बऱ्यावाईट गोष्टी आल्या आहेत. द्रौपदीच्या मनात पाच पांडवांव्यतिरिक्त इतर कोणाबद्दल विचार आला असता, तर त्याचे दर्शन महाभारतात खात्रीने आले असते. कर्णाकडे तिने कधी ढुंकूनही पाहिले नव्हते. तिच्या स्वयंवराच्या वेळी कशामुळे ते कोण जाणे... दुर्योधनाच्या प्रीतीमुळे असेल, कर्णाने पण जिंकण्याचा प्रयत्नसुद्धा केला नव्हता, असे संशोधित आवृत्तीवरून दिसते. सबंध महाभारतात तिचा व कर्णाचा संबंधच आलेला नाही. कर्णावर तिचे मन जडले, ही अती मागाहून आलेल्या जैन पुराणातील कथा आहे, महाभारतातील नव्हे. महाभारतातील द्रौपदी चडफडली, जळली, पण शेवटच्या क्षणापर्यंत पतिपरायण राहिली. तिच्या सबंध आयुष्यात आळ येण्यासारखी परिस्थिती कधी उत्पन्नच झाली नाही.
 तशा तऱ्हेची परिस्थिती यावी व आळही यावा, हे सीतेचे खरेखुरे दुःख. महाभारतात जी रामकथा सांगितली आहे, ती राम अयोध्येला परत आला व सर्वजण एकमेकांना भेटून, राज्याभिषेक झाल्यावर सुखाने राहिले, रामाने पुष्कळ यज्ञ केले, एवढ्यावरच थांबते. सीता-त्यागाची गोष्टच त्यात नाही. महाभारतातील ही व सावित्रीची, नळाची वगैरे गोष्टी द्रौपदीवर कोसळलेल्या आपत्तीच्या