पान:Yugant.pdf/105

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८६ / युगान्त


 हैहयाने गाय व रेणूका दोघींना पळविले होते. परशुरामाने हैहयाशी युद्ध केले. ते हैहयाच्या दांडगाईबद्दल होते, जे जमदग्नीच्या हक्काच होते, गाय व रेणूका- ते हिसकावून घेतल्याबद्दल. केवळ रेणुकेवरून नव्हे. रावणाशी युद्ध झाले, ते केवळ सीतेमुळे, सीता परत मिळाले असती, तर युद्ध झाले नसते. राम-रावणांच्या युद्धाचे सीता हे एकमेव कारण होते. द्रौपदी युद्धाचे कारण- निदान मुख्य कारण तर नव्हते. ज्या दिवशी आंधळ्या धृतराष्ट्राला तो थोरला मुलगा असतानाही वगळून पांडूला गादीवर बसवले, त्याच दिवशी युद्ध बीजे पेरली गेली. अगदी लहानपणापासून धृतराष्ट्राच्या मुलांचे आणि पांडूच्या मुलांचे वैर होते. द्रौपदीचे लग्न होण्याआधीच पांडवांना नाहीसे करण्याचे प्रयत्न झाले होते. उद्योगपर्वातील मसलतीवरूनही प्रामुख्याने हीच गोष्ट मनात ठसते. पांडव कौरवांजवळ आपला वाटा मागत होते. द्रौपदीच्या अपमानाची त्यात भाषा नव्हती. पांडवांनी आपला पुरेपूर वाटा मागितला असता किंवा कौरवांना चिडवण्यासाठी, अवास्तव मागणी केली असती, तरी पांडवांना अपमानाचा उगवायचा होता; काही झाले तरी लढाई करायची होती, आले असते. पण धर्मादिकांची भाषणे वाचून तर खात्री पटते की,सर्व भाषा आहे, युद्ध टाळून वाटा मिळवावयाची. जो भीम द्रौपदीसारखाच अपमानाने जळत असे तोही सांगतो की, “त्याना म्हणावं सर्वनाश करून घेऊ नका. जे काय थोडेसे धर्म मागतो आहे ते देऊन टाका" कृष्णालासुद्धा ह्या बोलण्याने हसू आले. "अरे नेहमीचा भीम ना तू?" असे त्याला म्हणावे लागले. द्रौपदी काय- ती सांगत होती,"कृष्णा, माझे केस ज्याने ओढले, ज्यांचे पापी हात माझ्या केसांना लागले, त्यांची गय करू नका" कुंतीने असाच निरोप धर्माला सांगितला, पण पांडवांनी व त्यांच्या वतीने कृष्णाने युद्ध टाळण्याची शिकस्त केली. केविलवाणेपणाने भीक मागावी, तशी पाच गावे मागितली, “सुईच्या अग्राखाली मावेल एवढीही भूमी नाही" असे दुर्योधन म्हणाला, तेव्हा युद्ध करावेच लागले.