पान:Yugant.pdf/104

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
युगान्त / ८५
 

झाले. युद्धात जित व जेते दोघेही दुःखी झाले. द्रौपदीची कर्ती मुले गेली, माहेर धुऊन निघाले. दुर्योधनाने मरता-मरता म्हटल्याप्रमाणे धर्मराज व त्याच्याबरोबर ती ह्यांनी विधवांवर राज्य केले. पूर्वी हस्तिनापूरचे राजकुल वृद्ध राजपुरुष, अवखळ तरणेबांड राजपुत्र, लहान मुले, नातवंडे, आज्या, आया, सुना, मुली ह्यांनी गजबलेले असायचे. धर्म राज्यावर आला, तेव्हा ते वैराण झालेले होते. मुलांची लग्ने झालेली नव्हती, म्हणून सती जाणाऱ्या सुना नव्हत्या. पण विधवा उत्तरा व तिचा एकुलता-एक बापामागून जन्मलेला मुलगा, एवढीच तरुण मंडळी होती. कुल पुरते निर्वैर झाले होते, पण राज्य जोडताना जोडलेली वैरे शमली नव्हती, हे आपल्याला महाभारतात दिसते. इंद्रप्रस्थ वसवताना खांडववन जाळले. त्या वेळी दुखावलेला तक्षक अर्जुनाचा सूड घेण्यासाठी टपून बसला होता. हे वैर अर्जुनावरती उगवता आले नाही, पण पांडवांमागून परीक्षितावर-अर्जुनाच्या नातवावर ते उगवले गेले. विजयाचा आनंद तर नाहीच, पण राख मात्र तोंडात भरून राहिली. श्रीकृष्णासारख्या युगपुरुषाचा जो जन्मभर आधार होता, तोही अगदी दुःसह रीतीने गेला. कृष्णाचा व त्याच्या सबंध मातब्बर कुलाचा हृदयद्रावक अंत झाला. महाभारताचा शेवट एकट्या द्रौपदीच्या आयुष्याचा किंवा पांडवांच्या आयुष्याचा किंवा कुळाचाही नव्हता. हा युगान्त होता. ह्या युगान्ताची प्रत्येक यातना द्रौपदीने भोगली. मुले मारली गेली, तेव्हा ती शेवटचे रडली; तिने शेवटचा तळतळाट केला. त्यानंतर तिचे शब्द ऐकायला येत नाहीत.
 द्रौपदीमुळे युद्ध झाले, अशी एक निराधार कल्पना कित्येकांच्या मनात आहे. महाभारतानंतर पुराणांतही, विशेषतः जैन महाभारतात ही कल्पना विशेषेकरून दिसते. एका आचरट पुराणात तर असा श्लोक आहे की, "कृतयुगात रेणुका कृत्या, सत्ययुगात सीता कृत्या, द्वापारात द्रौपदी व कलियुगात घरोघर कृत्या आहेत." ज्या बायकांमुळे मोठी युद्धे झाली किंवा रक्तपात झाला, त्यांची नावे ह्यात दिली आहेत.