पान:Yugant.pdf/103

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८४ / युगान्त


मिळाले. भाऊ भावांना भेटले. मुलगे आयांना भेटले. सून सासवांना भेटली. युद्धाची झळ अयोध्येला लागली नाही. ते फक्त कथेत राहिले.
 द्रौपदीवरची संकटे मानवी, ह्या जगातल्या माणसांनी आणलेली व नवऱ्यांनी स्वतःवर ओढवून घेलेल्या निष्क्रियतेमुळे आलेली. आदिपर्वात धृतराष्ट्राचे भाषण दिले आहे. त्यात व तिथपासून जवळजवळ प्रत्येक पर्वात द्रौपदीची विटंबना वर्णिताना दोन शब्द वारंवार येतात. 'नाथवती अनाथवत्' पाचांची असून अनाथासारखी. माहेर श्रीमंत असून अनाथासारखी. शूर पाठीराखे असताना अनाथासारखी. तिच्या दैन्याची खरी जखम हीच आहे. तिची विटंबना दर वेळी तिचे नवरे व सासरे मुकाट्याने पाहत होते. काही प्रतिकार करणे त्यांना शक्य नव्हते. एका विटंबनेतून दैवी चमत्काराने ती वाचली; दुसरीतून भीमाने गुप्तपणे तिला सोडविली; वनपर्वात जयद्रथाने तिला पळविली. तो प्रकार मात्र काव्यतंत्राला थोडासा धरून होता. धर्म-भीमार्जुन घरी नव्हते, अशा वेळी ती पकडली गेली. त्यांनी पाठलाग करून तिला सोडवली. सीतेच्या बाबतीत मात्र काव्याचा आदर्श प्रत्येक वेळी पाळला गेला आहे. रानावनात तिघे हिंडत असताना सीतेला पळवून नेणे शक्य नव्हते. नुसता रामच नाही, तर एकटा लक्ष्मणसुद्धा तिचे संरक्षण करण्यास पुरेसा होता. दोघेही नव्हते, व तेही सीतेच्या हट्टामुळे दूर गेले असताच सीताहरण झाले. सीतेच्या हरणाचा दोष सीतेकडे, रामलक्ष्मणांकडे नव्हे. सीतेच्या दुःखांचे स्वरूपच निराळे. तिच्यावर आपत्ती कोसळतात, पण त्यांचे निवारण होते. प्रत्येक आपत्तीतून ती, राम व त्यांची माणसे सुखरूप बाहेर पडतात. आपत्तीमुळे जास्तच थोर, जास्तच दैवी होऊन बाहेर पडतात. त्या आपत्तींची योजनाच मुळी त्यासाठी झालेली आहे.
 द्रौपदीला दुखावणारी माणसे होती. जवळची माणसे होती. प्रत्येक प्रसंगाने दुःखात अपमानाची भर दोन्ही बाजूंनी पडत होती. द्वेषाग्नीला सारखे इंधन मिळत राहिले. युद्ध खरोखरीच्या युद्धासारखे