पान:Yugant.pdf/102

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
युगान्त / ८३
 

स्वप्नसृष्टीतला हा वनवास होता. तिथे हरणे होती, हंस होते, गोदावरीचा रम्य प्रवाह होता, लांबवर पसरलेले वाळवंट होते. ऋषींच्या तुरळक-तुरळक वसाहती होत्या. अधून-मधून गोड शहारे अंगावर येण्याइतपत क्रुर श्वापदे व राक्षस होते. अपमानाची शल्ये नव्हती. मुलांची ताटातूट नव्हती, पाहुण्यांची वर्दळ नव्हती. ह्या सुंदर पार्श्वभूमीवर एका मुग्धेचे प्रणयिनीत रूपांतर झाले. वाल्मीकीने आपली काव्यशक्ती ह्या कांडात ओतली आहे. हा काळ इतका रम्य होता की, पुढे सीतेला डोहाळे लागले, तेही वनात जाण्याचेच.
 वनवास संपल्यावर द्रौपदीला अज्ञातवास फारच दुःखाचा गेला. रानात ती पांडवांची बायको, एका वेळची राणी अशी होती, पण ज्या दासीपणातून तिने द्युताच्या वेळी स्वतःला मुक्त करून घेतले होते, तसले दासीपण तिला अज्ञातवासात आले व जवळ-जवळ तसलीच विटंबना व्हावयाची वेळ आली होती. सीतेला दु:खात दिवस काढावे लागले, पण रावणाच्या बलात्काराचे तिला भय नव्हते. तिच्या भोवती राक्षसिणी होत्या. त्या अक्राळविक्राळ होत्या. त्या तिला म्हणत, "सीते, आम्ही तुला खाऊन टाकू." रावण संपन्न, विद्वान राजा होता. त्याच्या पदरी माणसे खाणाऱ्या राक्षसी असाव्या, हे विचित्रच. राम-रावणांचा संबंध अद्भुताचा. वानरे, अस्वले ही त्यांची सेना.. त्यातच राक्षस, सर्व कथाच अद्भुत रम्य व लोकोत्तर. राम आदर्श पुरुष. सीता आदर्श स्त्री. राम पितृभक्त, सत्यपरायण, एकपत्नी. तो शूर होता, हे दाखवण्यासाठी लढाईची जरूरी होती. नायिकेवर संकटे यावी लागतात; त्यांतून नायकाला तिची सुटका करावयाची असते. धीरोदात्त नायक-साध्वी नायिका. प्रणयाचे सर्व प्रकार. प्रारंभीचा प्रणय, प्रौढेचा प्रणय, मग विरह व विरही प्रेमाचे वर्णन... सर्व कसे अगदी संस्कृताच्या 'काव्य' परंपरेत बसणारे! लढाईसुद्धा त्यातलीच. एवढी लढाई झाली, पण तिचा संबंध अयोध्येशी नाही. अयोध्या अलिप्त राहिली. रामाला राज्य देण्याच्या क्षणाची वाट पाहत पाहत बसलेली. तो क्षण आला, तसे राज्य रामाला