पान:Yugant.pdf/101

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८२ / युगान्त


धर्मराजाचा पुरोहित त्यांच्याबरोबर होता. शेकडो लोक-बहुतेक ब्राह्मण-त्यांच्याकडे येऊन पाहुणचार घेऊन जात होते. द्रौपदी उठल्यापासून निजेपर्यंत काम करी, त्याचे वर्णन सत्यभामा-द्रौपदी संवादात आले आहे.
 वनवासातही थोरा-मोठ्या राजाची लेक, सून व बायको ही तिन्ही नाती तिला सुटली नाहीत. जी माणसे पाहुणचारासाठी येत, त्यांचे सेवाधर्माने करायचे, हा झाला ध्येयाचा भाग; पण अशा करण्यामध्ये परत राजकारण व व्यवहार होताच. धर्म करीत असलेली अनुष्ठाने व ब्राह्मणशुश्रूषा आज आपल्याला भाकड वाटली, तरी त्या वेळच्या सर्वांचा त्यांवर अगदी दृढतम विश्वास होता, आणि ही सर्व अंगे द्रौपदीला संभाळावी लागत. त्यात कमी पडू देण्याची, दैन्य दाखवायची सोय नव्हती.
 ह्या वनवासात राजवाड्यात मिळेल तेवढाही एकांत नव्हता. तेवढे ऐश्वर्य नसूनही आल्या-गेल्यांची व आश्रितांची वर्दळ होतीच. त्याशिवाय येईल-जाईल त्या ऋषीने सांगितलेल्या कंटाळवाण्या कथा ऐकाव्या लागत. ती सारखी कष्टी होती, ह्याचे पुरावे तर जागोजागी आहेत. कृष्णाने निरोप घेताना सांगितले. “बाई, ह्या सर्व अपमानाचे उट्टे निघेल बरे” सत्यभामेने मिठी मारून निरोप घेतला, “कृष्णे, रडू नकोस. ज्या तुला हसल्या, त्या कौरव-स्त्रियांना तू रडताना पाहशील. अगदी निष्कंटक, निर्वैर राज्याचा उपभोग घेशील. थोडे सहन कर." तिला तिळभराची उसंत नव्हती, हे एका अर्थाने बरेच होते. नाही तर कृष्णा द्युताच्या दिवसाच्या आठवणी काढून-काढून झुरला असती.
 सीतेच्या वनवासात कुठच्याही तऱ्हेचे वैर, शल्य काही नव्हते.एका तपावरचा काल प्रणयाच्या वर्षावाचा होता. अयोध्यला ती युवराज्ञी होणार होती; दासदासींचा गजबजाट होता; सासरा, तीन सासवा अशी वडील मंडळी होती. अनिर्बध प्रणयाला मुळी वाव नव्हता.