पान:Sanskruti1 cropped.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दोन

महाभारत आणि रामायण. २


महाभारत हा 'इतिहास' व रामायण हे 'काव्य’ म्हटले, यात दुसरे फरक ओघानेच आले आहेत. महाभारत हे रामायणापेक्षा कितीतरी मोठे आहे. पण ‘शांती’ आणि 'अनुशासन ' ही पर्वे वगळल्यास कथेचा धागा तुटल्यासारखा चाटत नाही. रामायणाचे तसे होत नाही. बालकांड बरेचसे प्रक्षिप्त आहे. अयोध्याकांडात कथा वेगाने चालते; पण पुढच्या कांडांतून कथेला रंग चढत नाही, काव्याला चढतो; व चमत्कृतीला भरती येते. महाभारतात पहिल्यापासून शेवटपर्यंत संघर्ष मानवी पातळीवरील व कौटुंबिक असा आहे. रामायणातही सुरूवात अशाच त-हेच्या संघर्षाने झालेली आहे. पण राम व भरत यांच्या कृत्यांमुळे कथेला कलाटणी मिळाली. बापाने आईला दिलेले वचन पाळण्यासाठी रामाने वनवास पतकरिला. भरताला राज्यावर बसवावे, हा त्या वचनाचा एक भाग होता. पण भरत मुळी राज्यावर बसायला तयारच नव्हता. त्यानंतर स्वतःला जाळून घ्यायची तयारी केली. भरत राज्यावर बसेना, राम राज्य घेईना, असा मोठा विचित्र पेच निर्माण झाला. शेवटी रामाच्या पादूका सिंहासनावर बसवून, कोठच्याही त-हेचा राज्योपभोग न घेता, व्रती राहून भरताने राम परत येईपर्यंत राज्यकारभार पहावा, अशी तोड निघाली. संघर्ष मिटला. दोन लोकोत्तर पुरूष केवळ प्रतिज्ञापालन करीत राहिले. म्हणजे अयोध्याकांडात कथेचा आरंभ ज्या संघर्षातून होतो. तो संघर्ष मुळी संपतोच. गोष्ट ही खरोखर संघर्षाबरोबरच संपलेली असते. पण काहीतरी द्वंद्व, काहीतरी पेच असल्याशिवाय कथा लांबू शकत नाही. म्हणून रामायणात अरण्यकांडापासून एक नवीनच कथा निर्माण झाली, असे म्हणावे लागते व सीतेला पळवून नेण्याच्या घटनेमध्ये एक अगदी नवीनच पेच निर्माण झाला.

                                                                      ।। संस्कृती ।।