पान:Sanskruti1 cropped.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काही काल नारदमुनीने येऊन पृथ्वीमधील उत्तमपुरूष हा अयोध्यावासी राम कसा आहे, त्याचे वर्णन केंले होते. ब्रह्मदेवाने सांगितले की, रामचरित्रातील कोठलीही गोष्ट वाल्मीकीला अज्ञात राहणार नाही. सांगितल्याप्रमाणे वाल्मीकीने आपला तरूण समकालीन जो राम, त्याच्यावर काव्य केले. युद्धाची हकीकत महाभारतात संजय सबंधच्या सबंध सांगत असे. पण तो स्वतः युद्धभूमीवर जात असे, असे दिसते. वाल्मीकी आपल्या आश्रमातून बाहेर गेले नाहीत. फक्त सीतात्यागानंतर रामाच्या दरबारी गेले तेवढेच. सर्व काव्य त्यांनी आपल्या आश्रमात बसून लिहीले. रामायण म्हणजे एका कवीला स्फूर्ती होऊन झालेले काव्य; 'शोकापासून उत्पन्न झालेले श्लोक' , ह्या सर्व गोष्टींचा विचार केला, म्हणजे असे वाटते की, रामकथा कदाचित एखादी सीता नावाच्या साध्वीची कथा असावी. अशा कथा लोकांमध्ये प्रसिद्ध होत्या. त्यांतील एखादीतरी कथा शोकान्त असावी, असे क्रौंचवधापासून केलेल्या सुरूवातीमुळे वाटते. ह्या लोककथा ऐकून वाल्मीकींनी एक मोठीच कथा रचून तीत तिची गुंफण केली, असे दिसते. महाभारत हे राजघराण्याच्या चार व जास्त पिढ्यांचा बखरीवजा इतिहास व काही जुने चरित्र असे आहे; तर रामायण म्हणजे काही लोककथा व काही अदभुत कथा यांचे मिश्रण आहे. हा एक मोठा फरक रामायण- महाभारतांत आढळतो. रामायणावर फ्रेंच व जर्मन पंडितांनी पुष्कळ काम केले आहे. त्यातला काही भाग, कै. डॉ. सुखटणकरांचा लेख व रामायणाच्या संशोधित आवृत्तीत संपादकांची निरनिराळ्या कांडांवरील प्रस्तावना व माझे स्वतःचे वाचन ह्या आधारावर हे लेख लिहीले आहेत. कै. भास्करराव जाधव ह्यांनी कित्येक वर्षांपूर्वी रामायणावर फार विचारप्रवर्तक लेख लिहिले होते. तेही मी वाचले आहेत. पण आता मात्र ते लेख माझ्यापुढे नाहीत

                                                                         -१९७०

। संस्कृती ।।