पान:Sanskruti1 cropped.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शब्द आहे. त्याचा अर्थ मनुस्मृती, महाभारत यांमध्ये एक 'हलक्या प्रतीचे नाटक , गाणे करणारे ब्राह्मण’ असा आहे. ज्यांना श्राद्धाला बोलावू नये. अशांच्या यादीत कुशीलव सापडतात. हे कुशीलव जोडीजोडीने आपला धंदा करीत असले पाहिजेत. म्हणून संस्कृतातील ‘कुशीलवौ’ हे द्विवचन रामायणात वापरलेले दिसते; आणि पुढे सीता त्यागाची कथा रचिली, तेव्हा कुशीलवौ चे कुश आणि लव असे दोन मुलगे झाल्याचा संभव आहे. कोशामध्ये दिले आहे की, 'कुशीलव’ हा शब्द हेमचंद्राने ('अनेकार्थसंग्रह') वाल्मीकीसाठी वापरला आहे. मेदिनीकोशात याचा असाच अर्थ आहे ,असे दिसते. त्यामुळे हा घोटाळा आणखी वाढतो. वाल्मीकी स्वतः हे काव्य रचून गाणारा कुशीलव होता की काय, अशी शंका येते. व्यास, वसिष्ठ, विश्वामित्र वगैरे ऋषींच्या कुळांची जशी आपल्याला पुष्कळ माहिती आहे, तशी वाल्मीकीबद्दल नाही. तो एक मोठा ऋषी होऊन गेला, ह्यापलीकडे बाकीच्या मागाहूनच्या कथांत असे सांगितले आहे की, वाल्मीकी हा ब्राह्मणेतर जातीतील एक मनुष्य होता. तो हिंसा करीत असे: पुढे त्याला उपरती झाली, व तो मोठा ऋषी झाला. ही कथा रामायणाच्या संशोधित आवृत्तीत नाही; ती फार उत्तरकालीन आहे. पण वाल्मीकी कुशीलव- जातीतील गायक होता, ह्या समजुतीला काहीतरी आधार असावा, असे वाटते. ऋषीचे कूळ शोधू नये म्हणतात ,तसे कवीचेही शोधू नये. तो कोणी का असेना. त्याच्या तोंडातून बाहेर पडलेले शब्द काव्य असले, म्हणजे झाले. सध्याच्या रामायणाच्या आवृत्तीत वाल्मीकी हा मोठा ऋषी होता, असे दाखविले आहे. तो स्नानाला गेला असताना एका व्याधाने क्रौंचपक्ष्यांच्या जोडीतील एकाला मारलेले त्याने पाहिले. उरलेली पक्षीण जोडीदार गमावल्यामुळे दुःखाने आक्रंदत होती. हे दुःख वाल्मीकीच्या अंतरी उमटले, व त्याच्या तोंडून रागारागाने व्याधाला उद्देशून शापवाणी बाहेर पडली. रागाने बाहेर पडलेले शब्द अनुष्टुभ् छंदात होते. वाल्मीकी घरी गेल्यावर ब्रह्मदेव स्वतः त्यांना भेटायला येऊन 'तुम्ही काय्य करा, असे सांगून गेला. ह्याआधीच

                                                                      ।। संस्कृती ।।