पान:Sanskruti1 cropped.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दुसरेही साम्य असेच सामाजिक स्वरूपाचे व हिंदूंच्या जुन्या राज्यपद्धतीमुळे उत्पन्न झालेले आहे. महाभारतात ज्याप्रमाणे लाहानलहान ,एका तालुक्याएवढीसुद्धा नाहीत अशी राज्ये, त्या राज्यांतील एकमेव शहर म्हणजे राजधानी व तेथे वंशपरंपरा राज्य करणा-या घराण्यांचे अस्तित्व ही दिसतात. अगदी तशीच रामायणातही आहेत. अयोध्या, मिथिला, अंगदेशाच्या रोमपादाचे राज्य, विशाला नगरीचे राज्य ही सगळी अगदी एकमेकांजवळ आहेत. रथात बसून राज्याच्या सीमेवर राम काय किंवा भरत काय, एका दिवसात पोहोंचतात. फरक हा की, महाभारतातील राज्ये व राजकुले वैवाहिक, कौटुंबिक व राजकीय संबंघांनी बांधिलेली किंवा तुटलेली अशी आहेत. हे संबंध गोष्टीला पोषक असे आहेत. तसा प्रकार रामायणात मुळीच नाही. दोन्ही पुस्तकांत कथानायकावर वनवास ओढवला आहे व दोन्ही पुस्तकांत युद्ध आहे. एका पुस्तकाचे मूळचे रूप ‘एक इतिहासव दुस-याचे ‘एक कथा ' असे असावे: कृष्ण काय किंवा राम काय, ह्यांना अवतार मागाहून ठरविण्यात आले. त्यामुळे अवतार म्हणून येणारी त्यांची वर्णने व त्यांच्यां अंगाने आलेल्या इतर गोष्टी दोन्ही पुस्तकांत मागाहून घुसडत्या आहेत. महाभारतात संभवपर्व ब अंशावतरण म्हणून जो भाग आहे, त्याचीच नक्कल रामायणात आढळते. विशेष गमतीदार साम्य पुढीलप्रमाणे आहे: महाभारतामध्ये भृगुकुलातील कोणा माणसाने जागोजाग, विशेषतः आदिपर्वात कथेशी संबंध नसलेल्या भृगुकुलाचा इतिहास घुसडला आहे. अगदी तोच प्रकार रामायणाच्या बालकांडात विश्वामित्राच्या इतिहासाबाबत झालेला आहे. कौशिक-कुलाचा हा सबंध इतिहास आणि रामायणाची कथा यांचा काडीमात्र संबंध नाही. आणखी एक साम्य म्हणजे महाभारतातील युद्ध आणि त्यावेळी होणारी लोकांची संभाषणे ही सर्वच्यासर्व संजयाला व्यासाने दिलेल्या दिव्यदृष्टीमुळे कळू लागली. तसेच, स्वतः अनुभविले नसताही दिव्यदृष्टीने सर्व रामचरित वाल्मीकीला अवगत झाले. महाभारत आणि रामायण ह्यांतील सर्व कविता अनुष्टुभ् छंदात आहेत. ह्यांखेरीज इतर भाषाविषयक, व्याकरणविषयक वगैरे पुष्कळच साम्ये हिन्दी व विलायती संशोधकांनी दाखविलेली आहेत.

                                                                      ।। संस्कृती ।।