पान:Sanskruti1 cropped.pdf/4

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एक

महाभारत आणि रामायण. १

 कालमानाप्रमाणे रामायणातल्या व्यक्ती महाभारतातील व्यक्तींच्या आधी सुमारे शे-सव्वाशे वर्षांच्या (Pradhan, Pargitar). रामायणाची कथावस्तू आधीची व महाभारताची नंतरची. पण महाभारत वाचल्यावर रामायण हातात घेतले की महाभारताच्या मानाने आपल्याला परिचित अशा आधुनिक सृष्टीत आपण वावरतो, असे वाटते.

 रामकथा महाभारतात आली आहे. आणि तिच्यात वाल्मीकि-रामायणातले श्लोकच्या श्लोक आहेत. ह्यावरून म्हणता येईल की, एकतर आपल्याला माहीत आहे त्या स्वरूपात रामायण महाभारतापूर्वी रचिले गेले, किंवा महाभारतात जे जुने रामोपाख्यान होते, त्यात कोणी नव्याने वाल्मीकिरामायणातील श्लोकांची भर घातली. ह्यांतील कोठचे बरोबर, हे सांगणे कठीण. पण असे वाटते की, महाभारत रचायच्या आधीपासून रामकथा लोकांना माहीत होती, व ती लोकांत गाइली जात होती. ह्या लोकगीतांचे वाल्मीकीने आदिकाव्य बनविले असावे; व भारतातल्या रामकथेतील श्लोक हे मागाहून घुसडून दिले असावे. महाभारत-रामायणांतील साम्ये खूपच आहेत; त्याचप्रमाणे त्यांच्यातील फरकसुद्धा फार विचार करायला लावतात. बरीचशी साम्ये बाह्यांगाचीच आहेत. महाभारतातील एकेका मोठ्या विभागाला 'पर्व' हे नाव दिले आहे, तर रामायणात पर्वाचाच अर्थ असलेला 'काण्ड' हा शब्द वापरला आहे. कवीचा स्वतः कथेशी संबंध दोन्ही काव्यांत दाखविला आहे. महाभारत, रामायणांतील साम्याचे एक कारण सर्वस्वी सामाजिक आहेः ते म्हणजे कथाविषय हिंदूंच्या पितृप्रधान, बहुपत्नीक, एकत्र - कुटुंबपद्धतीमुळे निर्माण झाला आहे हे. त्यामुळे कुटुंबाचे एकंदर चित्र व कुटुंबातील व्यक्तींचा संघर्ष ह्यांच्यात खूपच साम्य आहे.

।। संस्कृती ।।