पान:Sanskruti1 cropped.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ज्येष्ठानुवर्ती धर्मात्मां सानुक्रोशो जितेंद्रियः ।। २.४.२६ किन्तु चित्तं मनुष्याणामनित्यमिति मे मतिः। सतां च धर्मनित्यानां कृतशोभि च राघव । २.४.२७ “जोपर्यंत भरत ह्या नगरापासून (दूर) प्रवासाला गेला आहे. तोपर्यंतचाच काल तुझ्या अभिषेकाला योग्य, असे मला वाटते. हे खरे आहे की, भरत सज्जन आहे. वडिलांची आज्ञा पाळणारा, धर्मात्मा, दयाशील व स्वत:वर ताबा ठेवणारा आहे. पण मनुष्य कितीही चांगला, धर्मिष्ठ व सत्कृत्य केलेला असो, त्याचे मन चंचल असते; कोठच्या वेळेला ते कसे वळेल, हे सांगता येत नाही." हे सर्व दशरथ सांगत असतो; राम काहीही न बोलता ऐकत असतो व परत आईकडे जाऊन अभिषेकासाठी त्याने व सीतेने कसा उपवास करावयाचा, हे सांगतो. दशरथाने जे करावे, असा निश्यय केला होता - रामाला युवराज करण्याचा - तो योग्यच होता; पण निधड्या मनाने. उघड, आधी भरताला बोलावून, सर्वांच्या विचाराने हे व्हावयास पाहिजे होते. म्हाता-या, दुबळ्या दशरथाने कैकेयीची वंचना केली, यात शंकाच नाही. पण रामाने हे कसे ऐकून घेतले, ह्याचे आश्चर्य वाटते. पिता बोलेल, त्यावर एकही शब्द बोलावयाचा नाही; कारण तो पितृभक्त व लहान (अवघा १७ वर्षाच) होता म्हणून काय? राम कौसल्येला हा वृत्तांत सांगायला गेला, तेव्हा ती देवपूजा - विष्णूची पूजा - करीत होती. ह्याच संबंधात विष्णूचे जनार्दन (२.४.३३) असे नाव आले आहे. पुढे सहाव्या अध्यायात 'नारायणा'चा (२.६.१) उल्लेख आहे व राम अभिषेकाच्या आदल्या रात्री उपवास करून व्रतस्थ असा विष्णूच्या ‘आयतना'त राहिला (२.६.४) असे सांगितले आहे. रामायण वाचीत असताना आपण फार मागल्या काळची गोष्ट वाचीत आहोत असे वाटत नाही. है। ह्यामुळेच. हे सर्व उल्लेख मागाहून घुसडलेले असतील का? कौसल्येजवळ सुमित्रा होती व शेजारीच सेवेकरी वृत्तीने हात जोडून लक्ष्मण होता. राम त्याला म्हणतो. "लक्ष्मणा, माझ्याबरोबर पृथ्वीवर आता तू राज्य कर. तू माझा दुसरा आत्माच आहेस. ही लक्ष्मी तुला प्राप्त झाली आहे." ।। संस्कृती ।। १३