पान:Sanskruti1 cropped.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तीन

अयोध्याकांड. १

राम वनाला जातो.

रामायणातील सर्व काण्डांत कथेच्या दृष्टीने अयोध्याकाण्ड उत्कृष्ट आहे. कथा एकसंध, भराभर पुढे सरकणारी अशी आहे. स्थलकालाच्या दृष्टीने बहुतेक कथा एका शहरात घडते. थोडासा भाग राज्याबाहेर, गंगेच्या दक्षिण तीरावर घडतो, पण एकंदर प्रदेश फार मोठा नाही. कालाच्या दृष्टीने पाहिलेतर सुरूवात होते ती दशरथाने रासभा बोलाविल्यापासून व संपते चित्रकूटावर भावाभावांच्या भेटीने. ह्या कांडात संपादकांनी नागेश (१७००- १७५०) ह्या टीकाकाराच्या तिलक' ह्या टीकेला कालगणनेच्या दृष्टीने ग्राह्य मानिले आहे. मीही ती ग्राह्य मानिते. तो भाग असाः चैत्रशुक्लदशम्यां रामस्य प्रस्थानम्। और्ध्वदेहिकेन पक्षो गतः एवं वैशाखे गते, ज्येष्ठे भरतस्य चित्रकूटं प्रति प्रस्थानम्। अग्रे वर्षाकाले संनिहिते सति कार्तिक्यन्तं चित्रकूटे रामस्य वासः| चैत्र शुक्ल नवमीला राज्याभिषेकाबद्दल बोलणी होऊन दुस-या दिवसाचा मुहूर्त ठरला. दुस-याच दिवशी कैकेयीने वर मागितल्याप्रमाणे राम वनात गेला. नंतर पाच दिवसांनी पौर्णिमेला दशरथ मेला. भरत अयोध्येला पोहोंचावयाला एक पक्ष म्हणजे पंधरवडा लागला. दशरथाच्या उत्तरक्रियेत आणखी एक पंधरवडा गेला. नागेश म्हणतो, वैशाख असा गेला. म्हणजे त्याची कालगणना उत्तर भारतीय पौर्णिमान्त मासाची दिसते. दशरथ मरणाच्या दिवशी चैत्र संपला. ज्येष्ठामध्ये भरत रामाच्या भेटीला गेला. भरत सर्व लवाजम्यानिशी (राजमातांना घेऊन) सावकाश गेला. जायला सहज आठवडा- दीड आठवडा लागला असेल. भावाभावांची भेट होऊन सर्व उलगडा होऊन भरत परतला, तो निम्मा ज्येष्ठ झाला असेल. आता पावसाळ्यात पुढे जाणे नको, म्हणून राम कार्तिकी पौर्णिमेपर्यंत चित्रकूटास । संस्कृती ११ '