पान:Sanskruti1 cropped.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एका प्रसंगाने कलाटणी मिळाल्यासारखी वाटते. लहानपणची भांडणे व मारून टाकायचे बेत ह्यांतून पांडव वाचल्यावर धृतराष्ट्राने त्यांना. भीष्म व विदुर वगैरेंच्या सांगण्याने इंद्रप्रस्थाचे राज्य दिले. आता भावाभावांची लढाई लागायचे कारण मिटले होते. पण एकमेकांशी स्पर्धा करायची व वैर साधायचे, असे बाळकडूच त्यांना मिळाल्यामुळे वैर शमले नाही. इंद्रप्रस्थाचे राज्य वाढवून व मोठा थोरला यज्ञ करून कौरवांचा पाणउतारा करण्याची संधी पांडवांनी साधली. जुने वैर नव्या जोमाने पेट घेवून उठले. वनपर्वानंतर कृष्णाची शिष्टाई, समजा, जरी यशस्वी झाली असती, तरी इंद्रप्रस्थासारखाच प्रसंग पुन्हा ओढवला असता. हे भांडणच असे होते की, एका बाजूचा समूळ नायनाट झाल्याखेरीज ते तुटणारे नव्हते; आणि प्रत्येकजण आपल्या परीने ते वैर प्रज्वलित ठेवण्याचा प्रयत्न करीत होता. ज्यांना वैर नको होते, अशी माणसे निर्बल होती. कथेचा भयंकर शेवट व त्याची बीजे कथेच्या प्रारंभापासूनच आढळतात. संघर्ष तीव्रतर होत जातो व आपल्या ठरलेल्या परिणामाप्रत पोहोंचतो; आणि माणसेही आपापल्या ठरलेल्या परिणामाने अंत पावतात. महाभारतात चटका लावते. ती हीच अप्रतिहतता. ह्याउलट रामायणाची गोष्ट आहे. सुरुवात महाभारताप्रमाणेच कौटुंबिक संघर्षांत आहे. भरत रामाला भेटायला येत असताना 'हा रामाला मारायला तर येत नाही ना?’ अशी शंका लक्ष्मण बोलून दाखवितो. 'राम वनवासात का असेना, पण तो जिवंत असेपर्यंत निष्कंटक राज्य भोगता यावयाचे नाही, म्हणून तर भरत रामाचा घातपात करायला आला नसेल ना,’ असे लक्ष्मणाला वाटते. ह्या सर्व गोष्टींचा उच्चार करूनही वाचणा-याच्या मनावर ताण उत्पन्न होत नाही. कारण भरताने आपले चरित्र आधीच प्रकट केलेले आहे. भरत आल्यावर दोघेही भाऊ निरनिराळ्या प्रतिज्ञा करीतात. त्यांतील कठीण प्रतिज्ञा बायकोसह वनवासात राहणा-या रामाची, का दुस-याची ठेव म्हणून काहीही उपभोग न घेता राज्य पाहणा-या भरताची, हे ज्याचे-त्याने ठरवावे. पितृप्रधान, बहुपत्नीक कुटुंब पद्धतीत जे संघर्ष व दोष उत्पन्न होतात, त्यांचा अशा पद्धतीने निकाल लाविता येतो, हे रामकथेत दिसते. ।। संस्कृती ।।