पान:Sanskruti1 cropped.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

किष्किंधाकांडात वाली-सुग्रीवांच्या गोष्टीत एक संघर्ष दाखविला आहे; व त्यात सुग्रीवाशी सख्य करण्याच्या इच्छेने राम गोवला गेला आहे. ही उपकथा व पेच त्या कांडातच संपतात. अरण्यकांडात आणिलेला पेच युद्धकांडाच्या शेवटी सुटतो. परत एकदा कथा संपते. पुढे वाचायला काही राहतच नाही. महाभारतात सांगितलेली रामकथा येथेच संपते. पण रामायणामध्ये आणखी एक कांड आहे. त्यात सीतात्यागाचा एक नवीनच पेच निर्माण केलेला आहे. हा सबंध भाग प्रक्षिप्त आहे, हे मागेच सांगितलेले आहे. रामायणाचा पहिला भाग सर्वस्वी मानवी पातळीवरील आहे; दुसरा भाग वृक्ष व वानर ह्यांच्यासंबंधी आहे; तर तिस-या भागात सर्व मायावी राक्षस, वृक्ष व वानर असून रामलक्ष्मण व सीता एवढीच माणसे त्यात आहेत. रामायणातील अरण्यकांड म्हणजे तर ऋषींच्या आश्रमांचे एखादे प्रवासी गाईड असावेसे वाटते. ह्या कांडात ज्या त-हेने एकदोनदा इंद्र आलेला आहे, ती त-हा सर्वस्वी बौद्ध वाङ्मयासारखी वाटते. ह्याच प्रदेशाच्या शेजारी बौद्ध व जैन संप्रदायांचा जन्म झाला. त्यांची छाया वाल्मीकिरामायणावर पडलेली आहे. अहिंसेबद्दलचे महाभारतातील व रामायणातील उल्लेख फार निरनिराळे आहेत. महाभारतात अहिंसा म्हणजे पशूना बेताने मारणे, ते नष्ट न होतील अशी खबरदारी घेणे, एवढाच होता. रामायणातही रामलक्ष्मण रोज शिकार करीत असत. युद्धात ही हिंसा कशी करू, असा प्रश्न रामापुढे आला नाही. पण अधून मधून उगीचच अहिंसेबद्दल श्लोक आले आहेत. वनात शिरल्याबरोबर सीतेच्या तोंडी अहिंसेबद्दल श्लोक घातले आहेत. त्यानंतर ती रामाला धनुष्य बाजूला ठेव, म्हणून सांगते. हा वेडा उपदेश सीतेने बालबुद्धीने केला, का बायकांच्या कोत्या बुद्धीने केला. असे कवीला दाखवावयाचे होते, न कळे! तसेच, ह्या ग्रंथाचे ब्राह्मणीकरणसुद्धा बरेच झालेले आहे. सकाळी व संध्याकाळी राम संध्या करीत असे व जागोजाग त्याने अशी संध्या केल्याबद्दल श्लोक- अर्धा-श्लोक आहे. संध्येबद्दल एवढी आस्था पांडवांना, कौरवांना व यादवांना नव्हती, असे दिसते. रामायणात काही कोडी उत्पन्न झालेली आहेत. त्यांचे उत्तर पुराणांनी दिलेले नाही. महाभारतात पांडव हस्तिनापुराचे राजे झाले. त्यांच्यानंतर परीक्षित गादीवर आला; त्यानंतर जनमेजय आला. हस्तिनापुर ही कुरूवंशाची ।। संस्कृती ।।