पान:Sahyadrichi Aart Haak Dr. Madhav Gadgil 22nd May 2023.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सह्याद्रीच्या मुलखात अजूनही पिकांचे अनेक पारंपरिक वाण तगून आहेत. अशा पारंपरिक वाणांच्यात वैविध्य ठेचून भरलेले असते, कारण याच्याच आधारावर ते वर्षानुवर्षे रोगांसारख्या, अचानक आलेल्या थंडीच्या लाटांसारख्या नवनव्या आव्हानांना सामोरे जाऊ शकतात. हे वाण कणखर, लवचिक, बहुढंगी असतात. म्हणूनच ते शतकानुशतके टिकून राहतात. त्यांचे उत्पन्न आजच्या सुधारित, संकरित, जनुकीय वाणांहून कमी असते; पण आधुनिक वाणांचे भरघोस पीक हे शेतात एकजिनसी परिस्थिती निर्माण करण्यावर भरपूर पाणी, रसायने ओतण्यावर अवलंबून आहे. असे वैविध्यहीन आधुनिक वाण नव-नव्या किडींना, रोगांना सतत बळी पडत असतात. फ काळ तगून रहात नाहीत. म्हणून शेतीशास्त्रज्ञांना सतत नव्याने उपटलेल्या किडी-रोगांना सामना देऊ शकणारे, नवे वाण प्रचारात आणायला लागतात. अशाच पद्धतीने आशियात आयू आर -१, आयू आर ८, आयू आर- ३४, अशी भाताच्या वाणांची माळच्या माळ प्रचारात आली आहे. असे नव-नवे वाण निर्माण करायला शास्त्रज्ञ धावतात किडीच्या नव्या अवताराला, अथवा खारावलेल्या जमिनीला किंवा अशाच इतर समस्यांना, निसर्गतः तोंड देऊ शकणाऱ्या पारंपरिक वाणांकडे. एखादा हवे तसे गुणधर्म असलेला वाण सापडला की त्यातला अनुवांशिक गुणधर्म - जनुक उचलून सुधारित वाणांत अंतर्भूत करतात. सन १९७० पासून पसरलेल्या तपकिरी तुडतुड्याशी असा यशस्वी सामना देणारे गावरान वाण निघाले केरळातल्या पट्टांबी संशोधन केंद्राच्या परिसरातले. तिथल्या शेतकऱ्यांनी परंपरेने जोपासलेले. ह्यातून आशियाभरच्या भातशेतीचे अब्जावधी रुपयांचे नुकसान टळले. ह्यानंतर सन १९९३ मध्ये अंमलात आलेल्या आंतरराष्ट्रीय जैवविविधता करारनाम्याप्रमाणे, तसेच आपल्या सन २००१ च्या 'पिकांच्या वाणांचे व शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण' ह्या कायद्यानुसार असे गावरान वाण हे जर सुधारित, संकरित, जनुकीय बियाण्याचा आधार असतील तर ते वाण जन करणाऱ्या शेतकरी समाजांना व्यापारी फायद्यातील लाभांश मिळाला पाहिजे हे तत्त्व वीकारले आहे. हे प्रत्यक्षात आणण्यासाठी गावरान वाणांच्या नोंदणीची व्यवस्था केली आहे. शिवाय या कायद्यात खास वैशिष्ट्यपूर्ण असे गावरान वाण, त्यांची नैसर्गिक उत्क्रांती चालू राहण्यासाठी, काही प्रमाणात शेतावरच वाढवत राहिले पाहिजेत व यासाठी पंचायतींना आर्थिक प्रोत्साहन दिले गेले पाहिजे अशी तरतूद केलेली आहे. सह्याद्रीची आर्त हाक!