पान:Sahyadrichi Aart Haak Dr. Madhav Gadgil 22nd May 2023.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कोळ्यांच्या वेगवेगळ्या जातींच्या धाग्यांचे गुणधर्मही वेगवेगळे असू शकतात. त्यांच्या फक्त भारतात आढळणाऱ्या ४५० जाती आहेत, शिवाय सारख्या नव्या नव्या सापडतात. अधिक अभ्यासांती आपल्याकडील अनेक जातींच्या कोळ्यांत विशेष गुणधर्मांचे धागे नक्कीच आढळतील. आणखी एक उदाहरण आहे विंचू, इंगळ्या, गोमांचे. ह्यांचे विष मज्जासंस्थेवर परिणाम करते. आज मानसोपचारांसाठी ह्यांच्या आधारे नव-नवी औषधे बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत. तसेच, पश्चिम घाटावर आढळणाऱ्या मरळसारख्या काही माशांच्या जाती आपली पिल्ले तोंडात वाढवतात, तेव्हा तोंडातल्या पाचकरसांपासून पिल्लांचा बचाव होत असतो. ह्या गुणवैशिष्ट्याचा फायदा घेऊन तोंडातल्या अल्सरसारख्या विकारांवर नवी औषधे शोधून काढणे सहजशक्य आहे. आतापर्यंत भारतातल्या सुमारे दीड लाख जीवजातींना शास्त्रीय नावे दिली आहेत. अंदाजच करायचा तर भारतात एकूण चार लाख जीवजाती असू शकतील. त्यातल्या दीड लाख निव्वळ भारतवासी असतील; आणि ह्या खास भारतापुरत्या मर्यादित असलेल्या जातींतील बहुतांश, लाख- एक, जाती पश्चिम घाटावरच्या निघतील. ह्या सान्या जनुक संपत्तीपासून भविष्यात मानवांसाठी उपयुक्त अशी अनेक उत्पादने सापडू शकतील. जायन्ट वुड स्पायडर आंतरराष्ट्रीय जैवविविधता करारनाम्याप्रमाणे ह्यांच्यावरचे संशोधन करण्यात भारताची भूमिका महत्त्वाची राहील, शिवाय भारत ह्या उत्पादनांवरील फायद्यात एक भागीदार म्हणून दावा करू शकेल. सह्याद्रीची आर्त हाक!